मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदक स्वप्न म्हणजे मधुबाला असे म्हटले तर वावगे वाटायला नको. मधुबालाच्या सौंदर्याचे आज अनेकजण चाहते आहेत. आज इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याला तोड सापडलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. 14 फेब्रुवारी 1933 रोजी मधुबालाचा जन्म झाला होता. सौंदर्याची राणी असलेल्या मधुबालाची कारकीर्द मात्र शापित ठरली. हिंदी समीक्षक मधुबालाच्या अभिनय काळाला स्वर्णयुग म्हणतात. नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने मधुबाला यांचे तिकीट काढून मान दिला होता. मधुबालाचे निधन 23 फेब्रुवारी 1969 रोजी झाले. जाणून घेऊयात तिचा प्रवास..... असे झाले नामकरण - आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी होते. बेबी मुमताज म्हणूनही तिला ओळखले जायचे. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्यांचे मधुबालावर विशेष प्रेम होते. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे मधुबाला असे नामकरण केले होते.
इंग्रजी येत नव्हते - मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. तिला एकूण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला आपल्या आईवडिलांची पाचवी मुलगी होती. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. त्यामुळं मधुबालाला इंग्रजीचा एकही शब्द बोलता येत नव्हता.
वडिलांचा पगडा - मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. मधुबाला खूप भावनिक होती. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीच पार्टी किंवा प्रीमिअरमध्ये दिसली नाही. वडिलांच्या विचारांचा तिच्यावर प्रभाव होता. वडिलांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी शेवटचा असायचा.
नवव्या वर्षी केलं चित्रपटात काम - मधुबालाने वयाच्या नवव्या वर्षी चित्रपटात काम केलं होत. 1942 मध्ये आलेल्या 'बसंत' या चित्रपटात मधुबालाने बालकलाकाराची भूमिका केली होती. त्यावेळी ती नऊ वर्षाच्यी होती. तर अभिनेत्री म्हणून 1947 मध्ये नीलकमल या सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम, किशोर कुमार यांच्याशी लग्न - ज्वार भाटा चित्रपटावेळी मधुबालाची भेट दिलीप कुमारशी झाली होती. दिलीपकुमार यांना पाहताच ती त्यांच्या प्रेमात पडली होती. मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम करु लागली होती. मुगल-ए-आझम या चित्रपटवेळी त्यांच्या प्रेम फुलले. दिलीप कुमार यांच्यासह लग्न करण्याची मधुबालाची इच्छा होती. मात्र दिलीप कुमार यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले.