मुंबई: अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केलेला तसेच पुरस्कार जिंकलेला 'हरे कृष्णा' हा चित्रपट भारतात इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांत रोहित शेट्टीच्या औरोस अवतार एण्टरटेन्मेंट कंपनीमार्फत देशभरातील पीव्हीआर थिएटर्समध्ये तसेच अन्य मल्टिप्लेक्सेसमध्ये १५ डिसेंबर, २०१७ रोजी प्रदर्शित होत आहे.
'इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस' अर्थात इस्कॉनचे संस्थापक श्री. ए. सी. भक्तीवेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद यांचे आयुष्य व कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. वयाच्या सत्तराव्या वर्षी भारतातील स्वामी श्रीला प्रभुपाद कोणत्याही पाठिंब्याशिवाय किंवा आर्थिक पाठबळाशिवाय श्रीकृष्णाच्या प्रेमाचा प्रसार करण्यासाठी अमेरिकेला गेले. अनेक अडचणी व अडथळे असूनही आपल्या दृढ निश्चय व विश्वासाच्या जोरावर त्यांनी जगभर अध्यात्माची एक ज्योत चेतवली. तिला आज 'हरे कृष्णा मुव्हमेंण्ट' म्हणून ओळखले जाते.
''“एक असामान्य आख्यायिका झालेले संत, विद्वान व धार्मिक गुरू श्रीला प्रभुपाद यांनी १९७०च्या दशकात भरकटलेल्या युवावर्गाला योग्य मार्गावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न हा चित्रपट एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवतो,”'' असे रोहित शेट्टी म्हणाले.
हॉलिवूडचे दिग्दर्शक जॉन ग्रीसर यांनी दिग्दर्शित केलेला 'हरे कृष्णा' हा चित्रपट एखाद्याची श्रद्धा किंवा व्यक्तिगत धर्म यांच्या पलीकडे जाऊन एक निराळ्या उंचीवर नेणारा अध्यात्मिक अनुभव देतो.
इस्कॉनचे अध्यात्मिक गुरू हिज होलीनेस राधानाथ स्वामी म्हणाले, ''“एक सामाजिक, तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक अभ्यास म्हणून श्रीला प्रभुपाद यांच्या आयुष्याची कथा त्यांनी जगातील लक्षावधी लोकांच्या आयुष्यात दिलेल्या अपवादात्मक योगदानामुळे वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या हिप्पींसाठी ते वरदान ठरले. हे हिप्पी नंतर त्यांचे अनुयायी झाले आणि कृष्णाच्या मार्गावर चालत राहिले. अर्थात श्रीला प्रभुपाद मात्र कायमच कोणतीही वैयक्तिक इच्छा न ठेवता पार्श्वभूमीला राहिले. प्रभुपाद यांची व त्यांच्या आयुष्याची मंत्रमुग्ध करणारी कथा बघून,अगदी आतापर्यंत आपल्यात असलेल्या या संताला जगाने ओळखले कसे नाही, असा प्रश्न प्रेक्षकांना पडेल.”''
अवघे जग राहू शकेल, असे घर बांधण्याचे स्वप्न श्रीला प्रभुपाद यांना बघितले होते आणि त्यांनी ते प्रत्यक्षात आणून दाखवले. आज जगात सातशे इस्कॉन मंदिरे आणि लक्षावधी भक्त आहेत. प्रभुपादांचे जगभरातील शिष्य मानवतेची एकच भाषा बोलतात, पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाबद्दल त्यांना अनुकंपा आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या जीवनशैलींचे व श्रद्धांचे पालन ते करतात, असे 'हरे कृष्णा' या चित्रपटात दाखवले आहे. ते खरोखरच सखोल बुद्धिमत्ता असलेले आणि अध्यात्मिक करुणा असलेले दैवी आचार्य होते. अध्यात्माची समज नसलेल्या समाजाबद्दल त्यांना कळकळ आणि अनुकंपा होती. भगवान श्रीकृष्णाच्या विशुद्ध प्रेमाला वाहिलेल्या या पुण्यात्म्याच्या आयुष्याभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो, असेही राधानाथ स्वामी म्हणाले.
श्रीला प्रभुपाद यांनी धर्मग्रंथ व वेदातील सखोल ज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सुलभ करून सांगितले. हे ज्ञान खरोखर समजले आणि आचरणात आणता आले तर माणसाचे भोग, दु:ख आणि चिंता दूर होतील आणि त्याला मानवी आयुष्याचा खरा हेतू समजेल.
श्रीला प्रभुपाद यांच्यामुळे प्रेरित झालेले हॉलिवूडचे दिग्दर्शक जॉन ग्रीसर यांनी अनेक वर्षे कष्ट करून श्रीला प्रभुपादांच्या आयुष्यावर तसेच योगदानावर चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट आपल्याला प्रभुपादांना बघण्या-ऐकण्याचा अप्रतिम अनुभव देतो तसेच त्यांची शिकवण- त्यांनी कळकळीने दिलेले शहाणपणाचे सल्ले आचरणात आणण्याची संधी देतो.
'हरे कृष्णा- द मंत्रा, द मुव्हमेण्ट अॅण्ड द स्वामी हू स्टार्टेड इट ऑल' तयार केला गेला तो पाश्चिमात्य समाजाला डोळ्यापुढे ठेवून पण या चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तो भारतासह जगभरात प्रदर्शित व्हावा अशी मागणी होती, असे जॉन ग्रीसर म्हणाले.
'हरे कृष्णा' प्रथम उत्तर अमेरिकेत तीन जून, २०१७ रोजी प्रदर्शित झाला आणि एक ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला. अमेरिका,ऑस्ट्रेलिया, रशिया, युक्रेन, कॅनडा आणि इझ्रायल या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आजपर्यंत हा चित्रपट जगभरातील १६४ शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अमेरिकेत प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हा डॉक्युड्रामा ठरला.
हा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाला आहे. हृषिकेश फिल्म फेस्टिवल, इझ्रायलच्या तेल अवीवमधील स्पिरिट फिल्म फेस्टिवल, हवाई येथील माउई चित्रपट महोत्सव, अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील अवेरनेस फिल्म फेस्टिवल, अॅरिझोना राज्यातील सेडोना येथील इल्युमिनेट चित्रपट महोत्सव आदी ठिकाणी हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. यातील इल्युमिनेट या चित्रपट महोत्सवात 'हरे कृष्णा'ला सर्वोत्तम चित्रपटाचे ज्युरी अवॉर्ड मिळाले.
हा चित्रपट इंग्रजी, हिंदी डबिंग तसेच स्पॅनिश, रशियन आणि पोर्तुगाल भाषांत व अन्य अनेक भाषांत उपशीर्षकांसह (सब-टायटल्स) बहुतेक सर्व देशांत (भारत वगळता) प्रदर्शित करण्यात आला आहे.