Join us  

अनिल कपूरवर चोरीचा आरोप; अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 3:12 PM

Anil kapoor: अभिनयासह अनिल कपूर त्याच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो एका चोरीमुळे चर्चेत आला आहे.

बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता म्हणून कायम अनिल कपूरकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनयासह अनिल कपूर (anil kapoor) त्याच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो एका चोरीमुळे चर्चेत आला आहे. हो. अभिनेता अनिल कपूरवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोप त्याचा लेक हर्षवर्धन कपूर याने केला आहे. 

२०२० मध्ये आलेल्या AK vs AK या चित्रपटात अनिल कपूर आणि हर्षवर्धन (harshvarrdhan kapoor) या पिता-पुत्राच्या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाविषयी हर्षवर्धनने अलिकडेच काही मजेशीर किस्से शेअर केले. यात सेटवर अनिल कपूर जेवण चोरायचे असा मजेदार आरोप त्याने केला.

काय म्हणाला हर्षवर्धन?

'सेटवर तुम्ही दोघं एकत्र जेवायचे का?' असा प्रश्न हर्षवर्धनला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं. "ते दुसऱ्यांचं जेवण खातात. तुमच्या दोघांकडे सेमच पदार्थ असेल तरीदेखील त्यांना तुमच्याच ताटातलं खाटला आवडतं. ते माझं जेवण माझ्यासमोर चोरतात. तसंही मी फार मी खातो याचा अंदाज तुम्हाला माझ्या शरीरयष्टीकडे पाहिल्यावर कळेल. पण, तरीदेखील ते माझ्या ताटातलंच अन्न खायचे", असं हर्षवर्धन म्हणाला. त्याच्या या वाक्यावर अनिल कपूरनेही स्पष्टीकरण दिलं. 

काय म्हणाला अनिल कपूर?

"मी किती उदार आहे हे माझ्याकडे पाहूनच तुम्हाला समजेल. मी माझं जेवण कोणाबरोबरही शेअर करु शकतो. पण हे लोक मला कायम अडवतात. याला नका हात लावू, तुम्ही माझं जेवण घेऊ शकत नाही, असं हा म्हणतो. अरे जेवणच आहे ना आणि इतके वर्ष मीच तुला लहानाचं मोठं केलंय. मग मला तर थोडं तुझ्यातलं जेवण दिलंच पाहिजे ना", असं अनिल कपूर म्हणाला.

दरम्यान,  अनिल कपूरने या मुलाखतीत आपल्या मुलांविषयी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. यात हर्षवर्धन आता त्याच्या पायावर स्वतंत्र उभा राहिल्यामुळे त्याला लेकाचा अभिमान आहे. मात्र, तो कुटुंबापासून दूर एकटाच राहत असल्याची खंतदेखील अनिल कपूरला वाटते.

टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा