- चंद्रकांत कुलकर्णी(दिग्दर्शक)
केवळ परदेशांतील नाटकं बघणं म्हणजे जागतिक रंगभूमीचा अभ्यास करणं असं नाही. रंगभूमी त्या त्या काळात प्रत्येक देशामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा विविध हेतूने सुरू असते. याच कारणामुळे जागतिक रंगभूमीचा शोध घ्यायचा म्हटल्यास तिथे काय काय चाललं आहे ते बघावं लागतं. मी लंडन-अमेरिकेसारख्या देशात जाऊन नाटकं पाहिली, पण तेवढं केल्यानेही जागतिक रंगभूमी समजली असं होत नाही. तिथे राहून आताची नाटककारांची पिढी कशी लिहितेय, तिथे कुठल्या प्रकारचं थिएटर सुरू आहे हे पाहावं लागेल.
२७ मार्चच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाटक कुठे आहे, याचा आपल्याला पुन्हा वेध घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे पाश्चात्त्य नाटकांची रूपांतरं-भाषांतरं खूप झाली आहेत. विलियम शेक्सपिअरपासून बर्तोल्त ब्रेख्तपर्यंत बऱ्याच लेखकांची नाटकं आपल्याकडे भाषांतरित करून रंगभूमीवर आली आहेत. लेखकाने काय लिहिलं आणि दिग्दर्शकांनी ते कसं सादर केलं हे महत्त्वाचं असतं. मी ‘हॅम्लेट’ भव्य-दिव्य स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडेही भव्य निर्मिती होऊ शकते हा विचार त्या मागे होता. काही फ्रेंच नाटकं अनुवादित करून मराठीत सादर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र सांस्कृतिक सेंटरच्या माध्यमातून श्रीरंग गोडबोले, विभा देशपांडे, डॉ. मोहन आगाशे यांनी ग्रीस चळवळ सुरू ठेवली. जर्मनीच्या ग्रीस थिएटरमध्ये मोठ्यांनी लहान मुलांच्या भूमिका करून ते नाटक बाल प्रेक्षकांसमोर सादर करण्याची कॉन्सेप्ट आहे. लहानग्यांच्या भावविश्वात लहानग्यांना रमू दिलं जातं. जगण्यातील लहान-सहान मुद्दे लहान मुलांसमोर सादर करण्याचं काम मनोरंजकपणे झालेलं आहे. जगण्याचे आशयसारखे असले की त्यांचा आणि आपला अचूक मेळ बसतो.
परदेशातील ब्लॅक थिएटरची संकल्पना आपल्याकडच्या दलित चळवळ आणि थिएटरशी त्या काळात मॅच झाली. परदेशात जाऊन नाटक सादर करत असल्याने आपण ग्लोबल झाल्याचं म्हटलं तर सध्या फक्त टूर अँड ट्रॅव्हलिंग सुरू आहे. त्या पलीकडे जाऊन नाट्य क्षेत्रात ॲक्टिव्ह असलेल्या लोकांनी परदेशी नाटकं पाहिली पाहिजेत, ती अनुभवली पाहिजेत. आता आपली लोकल टू ग्लोबल ही थीम झाली आहे. या अंतर्गत व्यावसायिक तसंच प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकं परदेशांमध्ये होत आहेत. लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये मराठी नाटकांचे खूप प्रयोग होत आहेत. तिथले मराठी प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत, पण तिथे नीट सादरीकरण झालं पाहिजे. अमेरिकेमध्ये बंगाली थिएटर असोसिएशन आहे. ते बऱ्याच वर्षांपासून विजय तेंडुलकरांची नाटकं करतात. त्यांनी पुण्यामध्ये इंग्रजी भाषेत ‘सखाराम बाईंडर’ नाटकाचा प्रयोग केला. जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमीची जितकी देवाण-घेवाण वाढेल तितका दोन्ही रंगभूमींना फायदा होईल.