काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरुन 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याच्या ऐवजी आता कलर्स मराठीवर निलेश साबळे एक नवा कॉमेडी शो घेऊन आला आहे. हसताय ना? हसायलाच पाहिजे या त्याच्या नव्या शोमध्ये हवा येऊ द्या आणि हास्यजत्रामधील (maharashtrachi hasyajatra) काही लोकप्रिय कलाकार पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, आता त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
निलेश साबळेने (nilesh sable) या नव्या कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक होते. परंतु, हा शो ऑन एअर गेल्यानंतर मात्र, प्रेक्षकांच्या पदरात निराशा पडली आहे. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आता लोकांनी निलेश साबळे आणि त्याच्या टीमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अलिकडेच या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला. या पहिल्या भागात बाईपण भारी देवा या सिनेमाच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्यासह सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांनी बाईपण भारी देवामधील भूमिकांचं सादरीकरण केलं. मात्र, यावेळी ओंकार आणि भाऊ कदम यांना स्त्री वेशात पाहून नेटकरी संतापले आहेत. या एपिसोडचा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर टीकेचा पाऊस पाडला आहे.
नेमकं काय म्हणाले नेटकरी?
'ओंकार भोजने तुझे ‘अग्ग अग्ग आई’ या स्किटची आठवण येत आहे. तू त्याच मालिकेत भारी होतास', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्रियांच्या भूमिका साकारून जी माती खात होता, तेच इथेही करत आहात, वेगळं काय करताय तुम्ही?,असं अन्य एक युजर म्हणाला आहे. त्यासोबतच 'ओंकारला अशा भूमिका अजिबात शोभत नाहीत. हास्यजत्रामध्ये हा तारा होता आणि इथे बल्ब वाटत आहे', 'यांना स्त्री पात्र होऊनचं काम का करायचे आहे? त्या शिवाय लोकांना हसवू शकतं नाही का? कॉमेडी काही जमत नाही राव यांना. तेच तेच कंटाळवाणे वाटत आहे, 'ओंकार भोजनेचा फुगा फुटला आहे आणि एक कळले की जोपर्यंत पडद्यामागील लेखक चांगली स्क्रीप्ट लिहीत नाही तो पर्यंत पडद्यावर कितीही मातब्बर कलाकार असो हास्य निर्माण होणारच नाही', ‘चला हवा येऊ द्या’मधील स्त्री पात्र करणारे भाऊ कदम, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके आधी सुसह्य वाटायचे पण आता भाऊ कदम मात्र चक्क पकाऊ अभिनेता वाटत आहे', 'निलेश साबळेंनी आत्मपरीक्षण करावे आणि पुन्हा एकदा चांगल्या स्क्रिप्टवर मेहनत घ्यावी.”
दरम्यान, सध्या या कार्यक्रमाविषयी संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, कायम पुरुष कलाकारांना स्त्री वेशात पाहून प्रेक्षक मात्र कंटाळल्याचं त्यांच्या एकंदरीत कमेंटवरुन लक्षात येतं.