अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. नुकतंच भारतीय क्रिकेट संघानं 2024 चा T20 विश्वचषक जिंकला आहे. यात विराट कोहलीचं देखील नाव चर्चेत आहे. विश्वचषकानंतर विराट लगेचच आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला रवाना झाला. त्यामुळेच आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगानं पसरत आहेत.
विराटच्या एका चाहतीने, निवृत्तीनंतर विराट कोहली लंडनला शिफ्ट होईल का? असा प्रश्न करत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत चर्चा सुरू झाली आहे. अनुष्का-विराट आता लंडनमध्ये राहणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर अधिक जोर धरू लागली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून अनुष्का लंडनमध्येच वास्तव्यास आहे. गेल्या डिसेंबर महिन्यातच मुलगी वामिकासोबत अनुष्का लंडनमध्ये शिफ्ट झाली, तेव्हापासून ती तिथेच राहत आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने बाळाला जन्म दिला. अनुष्काला लंडनमध्ये राहून जवळपास 7 महिने उलटून गेले आहेत.अनुष्का आणि विराट हे दोघेही जण पहिल्यापासून खाजगी आयुष्य जगणं पसंत करतात. त्यांची लेक वामिकाच्या जन्माला चार वर्ष उलटले तरी तिची एक झलकही आजवर दाखवलेली नाही. त्यामुळेच आपलं खाजगी जीवन जगण्यासाठी या जोडप्यानं कायमचं लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
अनुष्का ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक हिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहायला खूप आवडतं, पण गेल्या अनेक वर्षांपासून चाहते तिला मिस करत आहेत.अनुष्का शेवटची 2018 मध्ये शाहरुख खानसोबत "झिरो" या सिनेमात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने 2021 मध्ये वामिका या पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिने तिच्या "चकडा एक्स्प्रेस" चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. तिचा हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.