मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि 'हिरो' या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे 'अजिंक्य देव' (Ajinkya Deo). अजिंक्य देव यांनी फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहे. अजिंक्य देव ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचा धाकटा मुलगा आहे. अजिंक्य देव यांची पत्नी आरती देव लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.
अजिंक्य देव आणि आरती यांची लव्ह स्टोरी खूप हटके आहे. अजिंक्य देव हे पार्ले कॉलेजमध्ये होते. त्यावेळी ते बीएसस्सीच्या पहिल्या वर्षात होते. त्यांच्याच वर्गात आरती देखील शिकत होत्या. आरती यांना पाहताच अजिंक्य देव त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांचा मित्रांचा एक ग्रूप होता. ते ग्रूपमधून ट्रेकिंगला जात असत. त्यांचे बोलणे वाढले पण जवळीक निर्माण झाली नव्हती.
एक दिवस अजिंक्य यांनी आरती यांना प्रपोज करायचे ठरवले आणि त्यांनी चक्क जुहू बीचवर गाडी आडवी लावून आरती यांना प्रपोज केले. आरती या होकार देतील असे अजिंक्य यांना वाटत होते. पण भलतेच घडले. अजिंक्य यांनी प्रपोज करताच आरती या रडायला लागल्या. त्यामुळे अजिंक्य हेही घाबरले. कारण त्यांनी फक्त प्रपोजच केले होते. त्यानंतर ते दोघे बरेच दिवस बोलत नव्हते. एक दिवस अजिंक्य यांनी हो किंवा नाही हे विचारायचे ठरवले. त्यांनी थेट आरती यांना प्रेमाबद्दल विचारले आणि नकार असेल तर मी आयुष्यातून जातो, असे म्हटले. त्यावर आरती यांनीही होकार दिला.
अजिंक्य देव यांनी १९८५ साली अर्धांगिनी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. दोन वर्षानंतर १९८७ साली त्यांनी सर्जा या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे त्यांनी फक्त राष्ट्रीय पुरस्कारच जिंकला नाही तर त्यांचा प्रचंड चाहता वर्ग निर्माण झाला. मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर त्यांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. २००४ साली आन मेन अॅट वर्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपटात काम केले. शेवटचे ते जय भवानी जय शिवाजी मालिकेत पाहायला मिळाले.