कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात.
या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे. अभिनयासोबतच एरिअल डान्समध्येही ती पारंगत आहे. उर्मिलाला सतत काहीतरी शिकत राहायला फार आवडते. उर्मिला ही उत्तम नृत्यांगना आहे हे सगळ्यांनाचा माहित आहे. पण 'एरिअल सिल्क' हा नृत्यप्रकार शिकणारी ती पहिलीच मराठी अभिनेत्री आहे. आदिती देशपांडे यांच्याकडून तिने हा डान्सप्रकार शिकला आहे.
एरिअल सिल्क डान्सप्रकार हा रोप मल्लखांबाप्रमाणे सिल्कच्या कापडाचा वापर करुन सादर करण्यात येणारा हा खास प्रकार आहे. दोरी ऐवजी सिल्कच्या कापडाला धरुन लयबद्ध हालचाली करणे हे याचे विशेष कौशल्य असते. केवळ शारीरिकच नव्हे तर मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी हा प्रकार फार उपयोगी आहे.
उर्मिला कोठारेने 'शुभमंगल सावधान', 'आईशप्पथ', 'दुनियादारी', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी विशेष कौतुक केले होते.यासोबतच मराठी मालिका 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' यामध्येही तिने काम केले आहे. तर 'मायका', 'मेरा ससुराल' या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. लग्नानंतर आता उर्मिला तिचं आईपण एन्जॉय करत आहे. आपल्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकंच काय तर मुलगी जीजालाही एरिअल डान्स शिकवतानाचे फोटो शेअर केले होते. उर्मिलाने अभिनय कौशल्यासह आपल्या डान्सचाही छंद जोपासत असल्यामुळे तिचे सगळेच कौतुक करत आहेत.