Join us

मनाला भावणारं हृदयस्पर्शी नाट्य

By admin | Published: October 25, 2015 2:41 AM

मराठी रंगभूमीवर अभिनयाच्या प्रांतात दबदबा असलेल्या नावांमध्ये विक्रम गोखले आणि रीमा ही दोन ठळक नावे आहेत. या दोघांची स्वत:ची अशी खासियत आहे आणि त्यांच्या

तिसरी घंटा /- राज चिंचणकरनाटक : ‘...के दिल अभी भरा नहीं !’ मराठी रंगभूमीवर अभिनयाच्या प्रांतात दबदबा असलेल्या नावांमध्ये विक्रम गोखले आणि रीमा ही दोन ठळक नावे आहेत. या दोघांची स्वत:ची अशी खासियत आहे आणि त्यांच्या अभिनयाचे चांदणे रंगभूमीवर अनेकविध नाट्यकृतींतून वेळोवेळी पसरत आले आहे. या दोघांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे व त्यांच्या अभिनयावर प्रेम करणारे असंख्य चाहतेही आहेत. अशा वेळी हे दोन कलावंत एकाच नाटकात एकत्र येणे म्हणजे अपूर्व योगच म्हणावा लागेल आणि असा योग ‘...के दिल अभी भरा नहीं!’ या नाटकाने तमाम रसिकांच्या ओंजळीत अलगद घातला आहे.विक्र म गोखले आणि रीमा यांची या नाटकातल्या भूमिकांसाठी करण्यात आलेली निवड हीच मुळात भारावून टाकणारी गोष्ट आहे. त्यामुळे या नाटकाची गोष्ट या दोघांकडून एकत्रितरीत्या ऐकणे आणि अनुभवणे म्हणजे बोनसच आहे. नाटकाचा विषय तुमच्या-आमच्या परिचयाचा असला आणि त्याला गांभीर्याची झालर असली, तरी विक्र म गोखले व रीमा यांनी त्याला त्यांच्या अभिनयातून जी डूब दिली आहे, त्याने हा विषय अधिक झळाळून उठला आहे.वयाची साठी जवळ आली की निवृत्तीचे वेध लागतात आणि निवृत्तीनंतर घरी बसून करायचे काय, हा प्रश्न आ वासून समोर उभा राहतो. एकदा का माणूस रिटायर्ड झाला की अचानक मिळणारा मोकळेपणा, रोजची काम करायची सुटणारी सवय, खायला उठणारे घर अशा नाना विवंचना त्याच्या मानगुटीवर आपसूक येऊन बसतात. या नाटकातल्या अरुण नगरकर यांचेही असेच काहीसे झाले आहे. आता रिटायर्ड झाल्यानंतरच्या उर्वरित आयुष्यात नक्की करायचे काय या विचारात ते आहेत. त्यांची पत्नी वंदना, जिला प्रेमाने ते वंदे अशी हाक मारतात, ती टिपिकल गृहिणीवर्गात मोडणारी आहे. अरुण आणि वंदना यांच्या मुलाने कायमस्वरूपी परदेशी स्थलांतर केले आहे; तर त्यांची विवाहित मुलगी राधिका त्यांच्या घरी येऊन-जाऊन आहे.वंदना नगरकर या गृहिणी असल्या तरी आयुष्यात बरेच काही करायचे राहून गेल्याची टोचणी त्यांच्या मनाला आहे आणि यातूनच घरोघरी जाऊन पूजेचे पौरोहित्य करण्याचे काम त्यांनी स्वखुशीने स्वीकारले आहे. केवळ घरात नव्हे; तर बाहेरही स्वत:चे अस्तित्व जपण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तशा त्यांच्या कामात त्या व्यस्त आहेत. साहजिकच, रिटायर्ड अरूण नगरकर यांना, आता घरात करायचे काय याचा गुंता सुटता सुटत नाही. एकमेकांवर अतिशय प्रेम करणाऱ्या या दोघांमध्ये कधीमधी खटकेही उडतात. घरातल्या दैनंदिन घडामोडींच्या निमित्ताने या दोघांमध्ये रुसवेफुगवेही होतात. यातच त्यांचे शेजारी असलेले सुधीर मेढेकर यांची या कुटुंबात एन्ट्री होते. मेढेकर हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र चालवत आहेत. ते त्यांचे केवळ शेजारीच नाहीत; तर अरु ण व त्यांचे जुने ऋणानुबंध असल्याचे नाट्यात पुढे आविष्कृत होते. पती-पत्नीच्या नात्यातले प्रेम, ओढ, दुरावा, जवळीक, आपुलकी असे अनेकविध विभ्रम दृगोच्चर करत यातले नाट्य रंगत जाते.शेखर ढवळीकर लिखित या नाटकात ज्येष्ठ मंडळींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय हाताळला गेला आहे. हा विषय तसा गंभीर असला, तरी हलक्याफुलक्या पद्धतीने त्यांनी तो मांडला आहे. खुमासदार प्रसंगांची पेरणी करत यातल्या नाट्याचा गोडवा कसा वाढत जाईल, याला प्राधान्य देत त्यांनी आयुष्याचा हा पट रंगवला आहे. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी संहितेची गरज ओळखून बांधलेला हा प्रयोग लक्षवेधी आहे. फक्त पहिल्या अंकातला फोनवरचा प्रसंग, तसेच दुसऱ्या अंकातला विरंगुळ्याचा प्रसंग थोडे आटोपशीर व्हायला हवे होते. मात्र कधी हलकेच चिमटे काढत, तर कधी गहिवरून टाकत, छोट्या छोट्या गोष्टींतून फुलवत नेलेला हा प्रयोग म्हणजे आसू आणि हसू यांचे उत्तम मिश्रण आहे. विक्रम गोखले (अरुण नगरकर) व रीमा (वंदना नगरकर) या दोघांनी या नाट्याच्या कॅनव्हासवर जे काही रंगलेपन केले आहे, ते निव्वळ अनुभवण्याजोगे आहे. संहितेत न लिहिलेल्या जागा अचूक भरत, अनुभवाच्या जोरावर, अतिशय सहजतेने, पण तितक्याच गांभीर्याने या दोघांनी रंगवलेला हा प्रयोग म्हणजे दृष्ट लागण्यासारखी गोष्ट आहे. विक्रम गोखले व रीमा यांच्या अभिनयाची उत्कृष्टता दृश्यमान करणारे उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक ठरावे. नाटकात या दोघांची केमिस्ट्री इतकी तंतोतंत जुळली आहे की रंगमंचावर नाटक सुरू आहे यावर विश्वासच बसू नये.जयंत सावरकर यांनी सुधीर मेढेकर यांच्या भूमिकेत त्यांच्या हुकमी अभिनयाने लाजवाब रंग भरले आहेत. राधिकाच्या भूमिकेत बागेश्री जोशीराव हिने सहजाभिनयाचे दर्शन घडवले असून, या नाट्यातला चौथा कोन भरून काढला आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य प्रसन्नतेचा शिडकावा करणारे आहे. या नाटकाच्या निमित्ताने सुयोगने एक अतिशय हळुवार, हृदयस्पर्शी, भावनाप्रधान, पण तितकेच लव्हेबल असे अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारे नाटक सादर केले आहे. शेखर ढवळीकर लिखित या नाटकात ज्येष्ठ मंडळींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय हाताळला गेला आहे. हा विषय तसा गंभीर असला, तरी हलक्याफुलक्या पद्धतीने त्यांनी तो मांडला आहे. खुमासदार प्रसंगांची पेरणी करत यातल्या नाट्याचा गोडवा कसा वाढत जाईल, याला प्राधान्य देत त्यांनी आयुष्याचा हा पट रंगवला आहे.