चेन्नईमध्ये सध्या जोरदार पाऊस होत आहे. रस्त्यारस्त्यावर पाणी भरलं आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे ज्या पॉश ठिकाणी राहतात तिथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही पाणी शिरलं आहे. तेथील पूर्ण परिसरच जलमय झाला आहे. या ठिकाणी इतरही काही दिग्गज लोक राहतात ज्यांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
थलायवा रजनीकांत यांची सिनेमांमध्ये हटके स्टाईल पाहायला मिळते. मात्र खऱ्या आयुष्यात तेही अगदी सामान्य आहेत. रजनीकांत चेन्नईतील पोएस गार्डन या उच्चभ्रू भागात राहतात. तसंच फिल्म इंडस्ट्रीतील इतर काही लोकप्रिय कलाकार, शिवाय बिझनेसमन, वकील यांचीही त्या ठिकाणी घरं आहे. सध्या चेन्नईत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हा पॉश परिसरही जलमय झाला आहे. इतकंच नाही तर रजनीकांत यांच्या बंगल्यातही पाणी गेलं आहे. स्थानिक अधिकारी पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.
तमिळनाडूमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी गाड्याही अडकून पडल्या आहेत. पूराची स्थिती निर्माण झाली आहे. तेथील शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच संकटप्रसंगी हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे. अनैक फ्लाईट्सही रद्द झाले आहेत. रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने ट्रेन बंद पडल्या आहेत.
रजनीकांत नुकतेच 'वेट्टाइया' सिनेमात दिसले. १० ऑक्टोबरला सिनेमा रिलीज झाला. यामध्ये अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. आता रजनीकांत 'कुली' मध्ये दिसणार आहेत. सध्या सिनेमाचं शूट सुरु आहे.