Join us

Manisha Koirala Meets UK PM : मनीषा कोईरालानं घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट, फोटो शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:21 PM

मनीषा कोईराला ही नेपाळमधील एका संपन्न राजकीय कुटुंबातून येते.

नेपाळी वंशाची बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  मनीषा कोईराला ही नेपाळमधील एका संपन्न राजकीय कुटुंबातून येते. नुकतेच मनीषाने संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमधून इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. तिने यात 'मल्लिकाजान' ही भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. यातच मनीषा कोईरालानं ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली.

मनीषा कोईराला ब्रिटनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानी पोहचली.  ऋषी सुनक यांच्या भेटीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ब्रिटन आणि नेपाळमधील मैत्री कराराला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नेपाळची प्रतिनिधी म्हणून मनीषा ब्रिटनला पोहोचली होती. विशेष म्हणजे या खास प्रसंगी मनीषाची प्रमुख भूमिका असलेल्या 'हीरामंडी' या वेब सीरीजमधल्या तिच्या अभिनयाचं थेट ब्रिटनच्या पंतप्रधान आवासातील उपस्थितांनी कौतुक केलंय.

मनीषाने फोटो शेअर करताना एक लांबलचक नोटही शेअर केली आहे. मनीषानं लिहलं, 'युनायटेड किंगडम-नेपाळमधील मैत्री कराराची 100 वर्षे साजरी करण्यासाठी 10 डाउनिंग स्ट्रीटवर मला आमंत्रित करण्यात आलं. माझ्यासाठी ही एक सन्मानाची बाब आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना नेपाळबद्दल प्रेमाने बोलतात पाहून आनंद झाला. मी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट देण्याची विनंती केली.  तुम्हाला विश्वास बसणार नाही तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी हीरामंडी पाहिली आणि त्यांना आवडली. हे ऐकून मी आनंदी झाले'.

मनीषा कोईरालाचा जन्म काठमांडूमध्ये झाला होता. मनीषा कोईराला नेपाळी राजकारणी प्रकाश कोईराला यांची मुलगी असून तिचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान (1959-1960) होते. तिचे वडील प्रकाश कोईराला हे माजी पर्यावरण मंत्री आहेत. मनिषा कोईरालाचे दोन काका, गिरिजा प्रसाद कोईराला आणि मातृका प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत. तिच्या कुटुंबातील बऱ्याच व्यक्ती राजकारणात सक्रीय आहेत. 

टॅग्स :मनिषा कोईरालासेलिब्रिटीबॉलिवूडभारतनेपाळऋषी सुनक