Join us

माँ तुझे सलाम!

By admin | Published: May 08, 2017 5:45 AM

आपले लाडके सेलिब्रिटीही त्यांच्या आईच्या ऋणातच आहेत. जाणून घेऊया, नुकत्याच झालेल्या ‘मदर्स डे’ निमित्त त्यांनी त्यांच्या आईविषयी

- Team CNX -

‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ ही गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या गीताची ओळ ‘आई’ या शब्दांतील समर्पण, प्रेम, त्याग यांची अनुभूती घडवते. आईची थोरवी शब्दांत सांगता येत नाही. आपल्या आयुष्यात तिच्या केवळ ‘असण्याने’ किती बदल होतात हे अनुभवाअंती समजते. आई ही कुणाचीही असो, ती केवळ एक ‘आई’ असते. आपले लाडके सेलिब्रिटीही त्यांच्या आईच्या ऋणातच आहेत. जाणून घेऊया, नुकत्याच झालेल्या ‘मदर्स डे’ निमित्त त्यांनी त्यांच्या आईविषयी काय विचार मांडले आहेत ते...आईच्या प्रोत्साहनाने मिळाले बळ मी माझ्या आईला एक बिझनेसवूमन मानतो. तिने गश्मिर महाजनी नावाचे एक प्रोडक्ट बनवलं आहे. २० वर्षांत जे काही कमावलं आहे ते सर्व तिच्यामुळेच. मी जेव्हा १५ वर्षांचा आणि आई ५० वर्षांची होती, तेव्हा आम्ही एका आर्थिक चणचणीत अडकलो होतो. कर्ज न फेडल्याने आमच्या घराला बँकेने सील केले. माझ्या आईचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यांच्यामुळे मी डान्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्या वेळी आई एका थ्री स्टार हॉटेलमध्ये केवळ ३००० रुपयांसाठी हाऊसकिपरची नोकरी करीत होती. तेव्हा रात्री आम्ही पुण्याच्या रस्त्यांवर माझ्या डान्स कंपनीचे पोस्टर्स चिकटवत फिरलो. त्या वेळी मला कुठलेही काम हे कमी दर्जाचे नसते हे कळून चुकले. नंतर दिवस पालटले, मात्र तरीही आम्ही एकमेकांसोबत तेवढेच अ‍ॅटॅच होतो. नुकतेच मी माझ्या आईला यूएसला जाण्यासाठी तिकिटे दिली. तसेच, तिला हव्या असलेल्या सोन्याच्या बांगड्याही गिफ्ट केल्या आहेत.- गश्मिर महाजनी ‘आई माझी प्रेरणा’आईबद्दलच्या भावना शब्दांत कशा मांडायच्या, त्यासाठी शब्द खरंच कमी पडतील. आज मी या क्षेत्रात माझ्या आईमुळेच आहे आणि तीच माझं इन्स्पिरेशन आहे. मी असं नाही म्हणणार की, माझी आई माझी मैत्रीण आहे. कारण, मला मैत्रिणी खूप आहेत. पण आई एकच आहे आणि ती माझ्यासाठी आई म्हणूनच खूप स्पेशल आहे. मित्र-मैत्रिणींसोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करता, मी माझ्या आईसोबत सर्व गोष्टी शेअर करते, असं जर मी म्हणाले तर ते साफ खोटं ठरेल. मीही आईपासून काही गोष्टी एका आईसाठी असलेल्या आदरयुक्त भीतीपोटी लपवते. एका आई-मुलीचं नातं जसं असतं, आमच्या दोघींचं नातं अगदी तसंच आहे. मला ते कायम तसंच हवंय; पण माझी खरी आई माझे बाबा होते, त्यांनी माझ्या बुटाची लेस बांधण्यापासून ते गँदरिंगमध्ये माझा मेकअप करण्यापर्यंत सर्व काही केलंय. ‘मदर्स डे’ निमित्त मला माझ्या बाबांना ‘थँक यू’ म्हणायचंय.- तेजस्विनी पंडित‘आई माझ्यासाठी स्पेशल’माझी आई ही माझा आधारस्तंभ आहे. ती एक अशी व्यक्ती आहे जिला मी नेहमीच माझ्यावर अपार प्रेम करताना पाहिलं आहे. ती माझ्याशी पूर्णपणे कमिटेड आहे. ती आहे म्हणून माझं आयुष्य सुरळीत चाललं आहे. नाही तर सर्व गोंधळ असता माझ्या आयुष्यात. माझं तिच्यावर किती प्रेम आहे किंवा ती माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे सगळ्यांना सांगायला मला शब्द नक्कीच कमी पडतील. पण, माझं आणि तिचं नातं शब्दांत वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन की, मी तिची आणि ती माझी सावली आहे. - अमृता खानविलकर ‘आई माझा आधार’आई म्हणजे सर्वस्व, सपोर्ट सिस्टीम.. आज मी जे काही आहे ते आईमुळे.. तिच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळेच मी इंडस्ट्रीमध्ये आहे.. माझी मैत्रीण तर ती आहेच.. मैत्रिणीसारख्या आम्ही खूप भांडतोही.. पण मला माहितीये काहीही झालं तरी ती माझ्या पाठीशी नेहमीच असेल... अ‍ॅट एनी कॉस्ट...स्ट्राँगली...- मयूरी वाघ ‘आई माझी मैत्रीण’मी खूप लकी आहे की, ‘माझ्या आयुष्यात अशा दोन स्त्रिया आहेत ज्यांच्याशी मी भांडू शकते, ज्यांच्याजवळ माझं मन मोकळं करू शकते. जेव्हा मी दु:खी असते तेव्हा त्या दोघी माझा आधार असतात, ज्यांचा मी नितांत आदर करते. लोकांसाठी त्या दोघी माझी आई आणि माझ्या सासूबाई आहेत, पण माझ्यासाठी त्या माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. - मृण्मयी गोडबोले