सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराच्या बाहेर पडू नये असे सतत आवाहन सरकारकडून केले जात आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. पण काही लोक पोलिसांचे न ऐकता काहीही काम नसताना घराच्या बाहेर फिरत आहेत आणि एवढेच नव्हे तर पोलिसांनी अडवले तर पोलिसांवरच हात उचलत आहेत. आतापर्यंत अशा अनेक केसेस केवळ महाराष्ट्रात नाहीत तर भारतभर झाल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी येथे नुकतेच पोलिसांना मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणानंतर हेमंतने सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले आहे की, बंदुक द्या पोलिसांना काठ्या माणसांसाठी असतात... या जनावरांसाठी गोळ्याच... हिंमत नाही झाली पाहिजे परत...
हेमंतने केलेल्या या ट्वीटमधून तो या सगळ्यावर किती भडकला आहे हे आपल्या लक्षात येत आहे. केवळ हेमंतच नव्हे तर तर सोनाली कुलकर्णी देखील या सगळ्या प्रकरणावर संतापली आहे. कोरोनाच्या लढ्यात आतापर्यंत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. आपल्या सहकाऱ्यांचे निधन झाल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला आपले रडू आवरले नव्हते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत तिने लिहिले आहे की, एकीकडे माणसांतल्या जनावरांना आवरा.... दुसरीकडे आपल्यातल्या देव माणसांना श्रद्धांजली द्या... किती विडंबन... त्यांना ही मन असतं रे...नका मूर्खांसारखे वागू...
सध्या सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमे यांच्याच या ट्वीटची चर्चा रंगली आहे. पोलिसांवर हात उचलणारे हे जनावरच असतात असे लोक देखील कमेंटद्वारे सांगत आहेत.