Hemant Dhome : बॉलिवुडचा किंग शाहरुख खानची (Shahrukh Khan) लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी अख्खी दुनिया वेडी होते. सध्या शाहरुखने पठाण (Pathaan) सिनेमामधून बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. बॉयकॉट चा कोणताच परिणाम सिनेमावर झालेला नाही. तर अशा या शाहरुखच्या स्टारडमचा प्रत्यय मराठी अभिनेता हेमंत ढोमेलाही आला आहे. त्याने शाहरुखचा लंडन मधील एक किस्सा सांगितला आहे.
मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांने शाहरुख खानचे कौतुक करत त्याचा एक किस्सा शेअर केला आहे. तो म्हणाला, 'लंडनमध्ये शिक्षण संपल्यानंतर काही काळ नोकरी करत होतो. एक दिवस कामावरुन निघालो असताना ट्युब स्टेशनवर पोहोचलो. तेव्हा कळलं की आजचा प्रवास मोफत आहे. मग चौकशी केल्यानंतर समजलं की आज लेस्टर स्केअरला शाहरुख खानचा कार्यक्रम आहे. म्हणून सरकारने सर्वांसाठी मोफत प्रवास ठेवला आहे.'
तो पुढे म्हणाला, 'स्टारडम म्हणजे काय तर हेच. देशबाहेरचं सरकार आपल्यासाठी प्रवास मोफत करत तुमचं काम सेलिब्रेट करतं. कमाल! आज पठाणच्या निमित्ताने शाहरुखचा १८ वर्षांपूर्वीचा किस्सा आठवला. आजही या माणसाची जादू कायम आहे..हे खरंच प्रेरणादायी आहे. '
'एका सामान्य कुटुंबातून आलेला एक सामान्य मुलगा आपल्या मेहनतीनं आणि हुशारीनं कुठल्या कुठे जाऊ शकतो हे याचं उत्तम उदाहरण. आपण शांतपणे आपलं काम करत राहायचं. आपलं कामंच बोलतं! बाकी अडचणी वगैरे तर येतच राहतील.. आपण पुढे जात रहावं!'
हेमंत ढोमेने शाहरुखचा हा १८ वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला आहे जो नक्कीच भावूक करणारा आहे. शाहरुखने आपल्या मेहनतीने बॉलिवुडमध्ये स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तर त्याने जगभरात नाव उंचावलं आहे. हेच खरं स्टारडम आहे.