Join us

‘‘हॅपिटायटिस बी’मुळे ७५ टक्के लिव्हर निकामी झाले - अमिताभ बच्चन

By admin | Published: November 24, 2015 2:46 AM

‘हॅपिटायटीस बी’ची लागण झाल्याने अमिताभ बच्चन यांच्या यकृताचा ७५ टक्के भाग निकामी झाला होता.

मुंबई : खुद्द बिग बी यांना‘हॅपिटायटीस बी’ची लागण झाली होती. या आजाराचा त्यांनी निकाराने सामना केला मात्र त्यांच्या यकृताचा ७५ टक्के भाग निकामी झाला होता.  अमिताभ बच्चन यांनीच ही बाब शेअर केली. निमित्त होते ‘हॅपिटायटिस बी’संदर्भातील जनजागृती कार्यक्रमाचे. १५ वर्षांपूर्वी अमिताभ यांना ‘हॅपिटायटिस बी’ची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी योग्य ते उपचार घेतल्याने ते हॅपिटायटिस बी वर मात करु शकले. हीच त्यांची सत्यकथा ते हॅपिटायटिस बी जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून आता सर्वांसमोर मांडण्यात येणार आहे. 

आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने सोमवारी मुंबईतील ताज लॅण्ड्स एण्ड या हॉटेलमध्ये ‘हॅपिटायटिस बी’च्या जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे सदिच्छादूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा, राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, युनिसेफचे भारतातील प्रतिनिधी लुईस जॉर्ज अर्सेनॉल्ट, राज्यमंत्री राम शिंदे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक सी.के.मिश्रा आणि डॉ. जयंत बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात अमिताभ यांनी मनोगत मांडताना सांगितले की, १९८२ साला ‘कुली’ या चित्रपटाचे चित्रीकरण करताना माझा अपघात झाला होता. तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागली होती. यावेळी सुमारे २०० रक्तदात्यांनी मला रक्त दिले होते. त्यापैकी एकाला ‘हॅपिटायटिस बी’ची लागण झाली होती. त्याच्याकडून संक्रमित रक्त माझ्या शरीरात गेले. त्यामुळे मला ‘हॅपिटायटिस बी’ची लागण झाली. पण, निदान २००० साली झाले. मी सामान्य तपासणीसाठी डॉक्टरकडे गेलो होतो. त्यावेळी तपासणी करताना मला ‘हॅपिटायटिस बी’ची लागण झाल्याचे निदान झाले. त्यावेळी माझ्या यकृताचा ७५ टक्के भाग निकामी झाला होता. पण, तत्काळ उपचार केल्याने मी ‘हॅपिटायटिस बी’वर मात करु शकलो. ‘हॅपिटायटिस बी’ झालेल्या व्यक्तींना वेगळे काढू नका. त्यांच्याशी संबंध तोडू नका. लवकर निदान झाल्यास हॅपिटायटिसशी दोन हात करणे सोपे आहे. मी स्वत: ‘हॅपिटायटिस बी’चा रुग्ण असल्यामुळे मी जनजागृतीसाठी पुढे आलो आहे. पण, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खरी मेहनत असते ती फिल्डवर जाऊन काम करणाऱ्या वर्कर्सची. ते खरे हे कार्यक्रम चालवतात. मला माझ्या भारतीय डॉक्टरांवर विश्वास आहे. भारतातील युनिसेफचे प्रतिनिधी लुईस जॉर्ज अर्सेनॉल्ट यांनी यावेळी सांगितले की, मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी बाळाच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत ‘हिपॅटायटीस बी’ ची लस बाळाला देणे खूपच महत्त्वाचे आहे. जर आपण पोलिओच्या समूळ उच्चाटनाचे असामान्य लक्ष्य साध्य करू शकतो तर नक्कीच एकत्रितरित्या काम करून नियमित लसीकरणाच्या माध्यमातून या जीवघेण्या आजारावर देखील मात करू शकतो. (प्रतिनिधी)देशात दरवर्षी २ कोटी ६० लाख बालके जन्माला येतात. त्यापैकी ७० लाख बालकांना सर्व लसी मिळत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सर्व बालकांपर्यंत लसीकरण कार्यक्रम पोहचवण्यासाठी इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्या ७ जीवघेण्या आजारांवर (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षय, गोवर आणि हिपॅटायटीस बी) मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात अजून ५ लसींचा समावेश करण्यात येणार आहे. गेल्या एका वर्षात इंद्रधनुष्यच्या माध्यमातून ५ टक्के मुलांपर्यंत पोहोचलो आहेत. पुढच्या २ ते ३ वर्षांत ही टक्केवारी ६५ ते ९० टक्क्यांच्या घरात नक्कीच जाईल. - जे. पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्रीलहान मुलांना देण्यात येणाऱ्या पाच लसी आता एकत्र दिल्या जाणार आहेत. रविवारी उस्मानाबाद येथे पेंटाव्हॅलन लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘हॅपिटायटिस बी’ हा सायलंट किलर आहे. त्याचे निदान लवकर होत नसल्यामुळे आजार जास्त बळावतो. ‘हॅपिटायटिस बी’ची लागण ही रक्त संक्रमणातून होते. कॅरिअर स्टेजमध्ये असताना याचे निदान होत नाही. त्यामुळे रक्तदान केल्यावर एक नॅट ही विशेष तपासणी करण्यात येणार आहे. नॅट तपासणी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुढच्या काही महिन्यात ही तपासणी सर्व रुग्णालयांत उपलब्ध होईल. -डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री