कोरोना व्हायरलमुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मोठा फटका बसला. रिपोर्टनुसार, एकट्या बॉलिवूडला या काळात 1000 कोटींचं नुकसान सोसावं लागलं. लॉकडाऊन काळात शूटींग बंद असल्यामुळे शिवाय चित्रपटगृहांना कुलूप लागल्यामुळे मेकर्सनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. यादरम्यान अनेक बड्या मेकर्सनी ओटीटीवर सिनेमे रिलीज केले. आताश: परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. चित्रपटगृह खुली झाली आहेत. पण नुकसान मोठं असल्यामुळे चित्रपटगृहांत आणि ओटीटी अशा दोन्ही ठिकाणी सिनेमे प्रदर्शित करण्याचा नवा फंडा मेकर्स अवलंबत आहेत. आता या शर्यतीत साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांचे नावही सामील झालं आहे.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, साजिद यांनी अॅमेझॉन प्राईमसोबत (Amazon Prime Video) हातमिळवणी केली आहे. प्राईमसोबत पाच सिनेमांची डील 250 कोटी रूपयांना फायनल झाली आहे. या पाच चित्रपटांमध्ये अक्षय कुमारचा बच्चन पांडे, टायगर श्रॉफचा हिरोपंती 2, सलमान खानचा कभी ईद कभी दिवाली, कार्तिक आर्यनचा सत्यनारायण की कथा आणि सलमानचा किक 2 या पाच चित्रपटांचा समावेश आहे.
हे पाचही बहुप्रतिक्षीत सिनेमे चित्रपटगृहांसोबतच ओटीटीवरही रिलीज होतील. या पाच सिनेमांमध्ये ‘किक 2’ या सिनेमाचं नाव वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल. पण साजिद सलमानसोबत मिळून हा चित्रपट बनवण्यास प्रचंड उत्सुक आहे. याच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. सिनेमाची घोषणा झालेली नाही. पण हा सिनेमा नक्की बनेल, यामुळे त्याचे नावही करारपत्रात सामील करण्यात आलं आहे.या 5 चित्रपटांशिवाय साजिद यांच्याच प्रॉडक्शनचा लवकरच रिलीज होणारा ‘तडप’ या सिनेमाचा प्रीमिअरही अॅमेझॉन प्राईमवर होणार आहे.