मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी १९८० ते १९९० चा काळ गाजवला. या काळात थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज अशा एकाहून एक दमदार चित्रपटांची निर्मिती झाली. विशेष म्हणजे या चित्रपटात झळकलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. यातील एक कलाकार म्हणजे दिपक शिर्के (deepak shirke). हम, वंश, तिरंगा, व्हेंटिलेटर,थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज या आणि अशा अनेक हिंदी आणि मराठी सिनेमात नायकासह खलनायिकी भूमिका साकारुन दिपक शिर्के यांनी लोकप्रियता मिळवली. मात्र त्यांच्या कारकीर्दीची सुरुवातच लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या मदतीमुळे झाली होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूचा दीपक यांच्यावर गंभीर परिणाम झाला होता. खुद्द त्यांनीच याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते.
दीपक शिर्के यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांंच्या आठवणींना उजाळा दिला होता. यावेळी ते म्हणाले की, लक्ष्मीकांत म्हणजे लाख माणूस. ज्याचे माझ्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्याची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. लक्ष्मीकांत सिनेमाच्या सेटचा प्राण असायचा. नुसता धुमाकूळ. तब्येतीने खायचा आणि खाऊ घालण्याचा त्याला मोठा शौक होता. मोठा रॉयल माणूस होता.
त्याच्यामुळे मी इथे टिकलो. पण....
ते पुढे म्हणाले की, लक्ष्मीकांतमुळेच मला 'टूर टूर' हे नाटक मिळाले. या नाटकापूर्वी मी कधीच कॉमेडी हा प्रकार हाताळला नव्हता. त्यामुळे एवढ्या दिग्गज लोकांसोबत स्टेज शेअर करताना मला खूप भीती वाटत होती. पण लक्ष्मीकांत आणि टीमने मला सांभाळून घेतले. त्यामुळे ती भूमिका जमली. त्यानेच मला सर्वकाही दिले. त्याच्यामुळे मी इथे टिकलो. पण त्याच्या जाण्याचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला.
तो गेला आणि मीही खचून गेलो....
लक्ष्मीकांतच्या निधनानंतर मी जवळपास काम करणे बंदच केले होते. मी काम घेत नव्हतो. त्याच्या त्या शेवटच्या दिवसांचा मला धक्का बसला होता. त्याने असे जायला नको होतं. त्याला त्या अवस्थेत पाहवत नव्हते. खाणे कमी केले होते. पण तो गेला आणि मी पण रंगभूमीपासून बराच दूर गेलो. तो गेला आणि मीही खचून गेलो.