- सुधीर गाडगीळ (ख्यातनाम लेखक) राजकारणात गती असलेल्या साहित्यिक नानासाहेब गोरे यांना ‘नखचित्र’ काढण्याची आवड होती. प्रख्यात नट दत्ता भट प्रथम मुंबईत आले, त्या संध्याकाळी गिरगावच्या चौपाटीवर ‘नाशिकचा चिवडा चार आणे’ म्हणत चिवडा विक्री केलेली आहे. अमीन सयानींच्या घरात ठळक जागी सामाजिक नेते अच्युतराव पटवर्धनांचा फोटो लावलेला होता, तर राजकारणातले तरुण बुलंद वक्ते-नेते राज ठाकरेंकडे हजारांहून अधिक चित्रपटांचा संग्रह होता.प्रत्यक्षातल्या व्यवसायापेक्षा मूळ वेगळीच आवड असणारी अशी मातब्बर माणसं मी मुलाखतींच्या राज्यात अनुभवलेली आहेत. मालिका आणि जाहिरातींच्या सुरेल जगात ‘जिंगल’ किंग म्हणून ख्यातनाम असलेले ‘अशोक पत्की’ हे संगीतकार म्हणून यशस्वी असले तरी मुळात त्यांना कविता-गीते-गाणी करण्यात जास्त रस. अशोक पत्की मला एकदा सांगत होते, मी रबीन बॅनर्जी, मलाया चक्रवर्ती यांच्याकडे ‘सहायक’ म्हणून काम करू लागलो, तेव्हा शैलेंद्रजी, आनंद बक्षी, हसरत जयपुरी हे कवी तिथं यायचे. ते ‘अरे यार, ट्यून क्या है?’ विचारत. दुसऱ्या दिवशी सुमारे शंभर-सव्वाशे मुखडे-अंतरे, त्या मूळ ऐकलेल्या चालीवर बांधलेले घेऊन येत. ही जी त्या कवींची शब्दांवरची हुकुमत होती, ती मनात कुठेतरी रुजली होती. पुढे या जगात वावरताना ध्यानी आलं की, खेबूडकर, माडगूळकर गाणं लिहित, संगीतकार मग त्यावर चाल बांधत, मग त्यावर रेकॉर्डिंग व्हायचं; पण माझ्याबरोबरचे काही निर्माते मला म्हणाले, ‘अशोक अशी अशी सिच्युएशन आहे, त्यावर अगोदर तू चाल बनव, आपण त्यावर नांदगावकर, दवणे, शांता शेळके यांना त्या चालीवर शब्द लिहायला सांगू.’ त्यावेळची एक गंमत आठवते, एकानं मला चालीसाठी सिच्युएशन सांगितली. आमच्या हिरोईनला रात्री स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये तिचा प्रियकर येतो.. आता इथं एक लव्ह सीन लिहून दे. आमची पद्धत काय, तर निर्मात्यानं सांगितलेल्या सिच्युएशनवर ‘डद् डद् दरारा, दड दड दडाडा’ असे काही सूर बांधायचो. भावना पोहोचाव्यात म्हणून स्वप्नाच्या सिच्युएशनवर मी डमी शब्द लिहिले.. ‘काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला..’ ते घेऊन नांदगावकरांकडे गेलो. त्यांनी ते डमी शब्द- चाल ऐकली. ते म्हणाले, ‘अशोक हा तुझ्या शब्दातला मुखडा उत्तम आहे. तो तसाच ठेवू. नंतर बाकी अंतरे मी लिहितो.’ तर असा अवचित अर्धवट कवी मी त्यावेळी झालो..
अरे यार, ट्यून क्या है?..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 05:24 IST