Join us

झुंडशाहीची सनद?

By admin | Published: July 10, 2015 10:42 PM

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि तत्सम सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गोंगाट निर्माण करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्बन्ध लागू केले आहेत

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि तत्सम सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गोंगाट निर्माण करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्बन्ध लागू केले आहेत, त्यावरुन निर्माण झालेल्या न्यायालयीन वादात आता मुंबई भाजपाही उतरली आहे. आपला पक्ष केवळ देशातीलच नव्हे तर जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा पक्ष आहे आणि हिन्दुंच्या सणांवर न्यायालय आणू पाहात असलेले निर्बन्ध आम्हाला मान्य करण्यासारखे नाहीत, असे नमूद करुन पक्षाने उच्च न्यायालयात प्रतिवादी होण्यासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने घातलेले निर्बन्ध स्वीकारण्याची तयारी दाखविल्यानंतरच न्यायालयाने पक्षाला सहभागी करुन घेतले आहे. तथापि पक्षाच्या मूळ दाव्याचा अर्थ इतकाच की आम्ही संख्येने अधिक आहोत, तेव्हां आमचे म्हणणे केवळ ऐकूनच घेतले पाहिजे असे नव्हे तर त्यानुसार साऱ्यांनी कृतीदेखील केली पाहिजे. अर्थात, सेना असो की भाजपा, त्यांचा या संदर्भातील युक्तिवाद पाहाता, मोठी संख्या पाठीशी असल्याने त्यांनी जणू आपल्याला झुंडशाहीची सनद मिळाल्याचेच गृहीत धरलेले दिसते. उभय पक्ष तूर्तास हिन्दु धर्माचे स्वयंघोषित रक्षणकर्ते असल्याने याच धर्माच्या ग्रंथातील पुढील सुभाषित त्यांना ठाऊक असावे अशी शंका घेण्यास जागा आहे.शान्ति तुल्यं तपो नास्ति तोषान्न परमं सुखमनास्ति तृष्णापरो व्याधिर्न च धर्मो दयापर: या सुभाषिताचा अर्थ इतकाच की, शांततेइतके प्रभावी तप नाही, संतुष्टतेपरते परम समाधान नाही, पराकोटीच्या लालसेइतका महाभयानक रोग नाही आणि करुणा, दया आणि क्षमा याहून अधिक उत्तम जीवनकला नाही. योगायोगाने या सुभाषितामधील प्रत्येक उपदेश आज विशेष करुन सत्तेतील भाजपा आणि शिवसेना यांना लागू पडणारा आहे. गोंगाट, चित्रविचित्र आवाज, अस्वच्छता आणि गलिच्छपणा ही बव्हंशी हिन्दु देवालयांची आणि त्यांच्या निमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण आणि उत्सवांची व्यवच्छेदक लक्षणे बनली आहेत. जर खरोखरी इतक्या मोठ्या संख्येने लोक आणि हिन्दु लोक भाजपाच्या पाठीशी असतील तर हीच संधी आहे असे मानून तिने आपल्या पाठीराख्यांना किमान शांततेचे महत्व उलगडवून सांगण्यास कोणाचीच हरकत असणार नाही.