हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार कंगना राणौतने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूरही उपस्थित होते. सोबतच कंगनाची बहीण आणि तिची आई देखील उपस्थित होत्या. कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. नामांकनापूर्वी पड्डल मैदान ते गांधी चौक असा रोड शो काढण्यात आला.
कंगना राणौत आणि भाजपचे इतर बडे नेते फुलांनी सजवलेल्या गाडीतून पड्डल मैदानातून गांधी चौकात पोहचले. येथून कंगना पुन्हा पाच नेत्यांसह निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचली. कंगना राणौतची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्याशी तिची स्पर्धा होणार आहे. दोघांमध्ये चुरशीची लढत होणार हे निश्चित आहे.
काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंग यांच्यासाठी मंडी हा लोकसभा मतदारसंघ नवा नाही. 1971 पासून हा मतदारसंघ त्यांच्या आई प्रतिभा सिंह आणि वडील कै. हे वीरभद्र सिंह यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यादृष्टीने कंगनासाठी ही लोकसभा जिंकणे एक आव्हान राहणार आहे. या सीटकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे इथं कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं असेल.
कंगनाने अनेक दर्जेदार बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे केलेत. क्विन, तनू वेड्स मनू, तेजस, मणिकर्णिका, या सिनेमांमध्ये कंगनाने काम केलं आहे. तर इमर्जन्सी हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.