‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट विसरणं सिनेप्रेमींसाठी केवळ अशक्य. प्रेमात पडणा-यांसाठी आणि प्रेमात पडलेल्यांसाठी ‘डीडीएलजे’ हा चित्रपट अत्यंत खास आहे. शाहरूख खान (Shah Rukh Khan)आणि काजोलच्या (Kajiol) अभिनयानं सजलेल्या, अनेक विक्रम नोंदवणा-या या चित्रपटानं जणू लोकांना वेड लावलं. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की, तो बघावासा वाटतो.‘डीडीएलजे’मध्ये अनेक कलाकारांच्या भूमिका होत्या. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) यांची भूमिका. या चित्रपटात त्यांनी काजोलची आंटी कम्मोची भूमिका केली होती. कम्मो आणि अनुपम खेर यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री विशेष गाजली होती. पण ‘डीडीएलजे’च्या (DDLJ) क्लायमॅक्स सीनमधून मात्र कम्मो गायब होत्या. कम्मो संपूर्ण चित्रपटात दिसल्या. पण ऐन क्लायमॅक्समधूनच त्यांना गाळण्यात आलं. का? तर हिमाानी यांनी इतक्या वर्षानंतर याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.
त्या म्हणाल्या, ‘डीडीएलजे’च्या क्लायमॅक्समधून मी गायब असणारी एकमेव कलाकार होते. कारण माझ्या पतीचं निधन झालं होतं. त्यामुळे मला तिथं थांबणं शक्य नव्हतं. मी एका वेगळ्या मनस्थितीत होते. एका अनोळखी शहरात मी एकटीच पतीच्या अंत्यसंस्कारांची तयारी करत होते. त्यानंतर त्यांचा अस्थिकलश घेऊन हरिद्वारला घेऊन जात होते. चित्रपटात माझे आणि अनुपम खेर यांचे सीन होते. यशराजच्या युनिटने मला समजून घेतलं. मला मदत केली राखत समजुतदारपणा दाखवला.’ आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आणि सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक राहिला. अमरीश पुरी, फरीदा जलाल, मंदिरा बेदी, परमीत सेठी आणि सतीश शाह या चित्रपटात इतर कलाकार होते.