‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमात नामवंत परीक्षक म्हणून सहभागी झालेला संगीतकार-गायक हिमेश रेशमिया हा मिकल या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धकाकडून ‘पोलिश’ भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होता. हिमेशच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला चार चाँद लागले होते . हिमेशने यातील स्पर्धकांना विविध आव्हाने दिली, पण त्यांच्याबरोबर तो स्वत:ही काही गाणी गायला. मिकलचे भारतप्रेम पाहून हिमेश खुश झाला होता. त्याला मिकलची प्रशंसा करून आभार मानायचे होते, पण ते पोलिश भाषेत. पण त्या भाषेत बोलणे हे हिमेशला कठीण जात होते; परंतु त्याने कसतरी करून मिकलचे पोलिश भाषेत आभार मानले. त्याचे बोलणे ऐकताना सर्वांना हसू फुटत होते.
आपला आनंद व्यक्त करताना हिमेश म्हणाला, “मिकल हा एक वेगळाच स्पर्धक आहे. त्याला हिंदी भाषा येत नाही पण त्यातील गाणी मात्र तो सुरेख गातो ! त्याने भारतीयत्वाचा स्वीकार केला असून त्याचं प्रदर्शन करायला त्याला फार आवडतं. त्याची कामगिरी पाहून आणि भारतावरील त्याचं प्रेम पाहून मी भावनावश झालो आणि मला त्याच्याच भाषेतून त्याचे आभार मानावेसे वाटत होते. पोलिश भाषा बोलण्याची माझी ही पहिलीच वेळ असली, तरी त्याच्यासारखा शिक्षक मिळाला, हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. तसंच बादशहा, सुनिधी आणि प्रीतम यांच्याबरोबर मला एकाच मंचावर उपस्थित राहता आलं, याचाही आनंद असून स्पर्धकांना त्यांच्या रूपात चांगले मार्गदर्शक लाभले आहेत. या तिघांबरोबर मला एकत्र आणल्याबद्दल ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या टीमचा मी आभारी आहे.”
‘दिल है हिंदुस्तानी-2’ जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी शो आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणार््या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात त्यामुळे हा शो अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे.