राज चिंचणकरएक तरुण एका तरुणीच्या योगायोगाने प्रेमात पडतो आणि तिचा पिच्छा पुरवतो. अर्थात, तिला हे आवडत नाही, पण पुढे अगदी योगायोगानेच ते दोघे बालपणीचे सवंगडी वगैरे निघतात. नंतर त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होत राहाते. त्यात अचानक तिचे लग्न ठरल्याचे त्याला कळते. मग त्याच्या जिवाचा आटापिटा सुरू होतो. मधल्या काळात तिलाही त्याच्या प्रेमाचा अर्थ समजून चुकतो, पण पुढे काही उद्दात्त हेतूने त्याला प्रेमाचा त्याग वगैरे करावा लागतो, अशी गोष्ट हिंदी चित्रपटांत चघळून चोथा झालेली आहे. मग त्यावर मराठी चित्रपट करायचा, तर त्या कथेचे मराठीकरण करणे ओघाने आलेच. ‘प्रेमाय नम:’ या चित्रपटानेही याहून काही वेगळे केलेले नाही. परिणामी, मराठी ताटातल्या पदार्थांसाठी हिंदीचा मसाला वापरावा, असे काहीसे या चित्रपटाबाबत झालेले आहे.या चित्रपटाचा नायक प्रेम, हा अतिशय खट्याळ आणि अल्लड वगैरे आहे. म्हणजे चित्रपटाच्या कथेचे तरी तसे म्हणणे आहे. प्रीती नामक तरुणी त्याच्या समोर येताच, तो तिच्या प्रेमात पडतो. पुढे कोणत्याही हिंदी चित्रपटाला शोभून दिसेल, अशी वळणे घेत ही कथा पडद्यावर उभी राहते. या सगळ्यातून जुनाच फॉर्म्युला नव्याने उगाळण्याचे ‘कष्ट’ या चित्रपटाने घेतले असल्याचे स्पष्ट होत जाते. योगायोगांची मालिका, प्रेमाचा धुवाँधार वर्षाव, गाणी आणि हाणामारी असा सगळा मसाला यात ठासून भरला आहे. मात्र, तो चित्रपटाच्या एकंदर रेसिपीसाठी उपयोगी पडलेला नाही. या चित्रपटाचा शेवट मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. नेहमीच्या पठडीबाज शेवटापेक्षा वेगळा मार्ग चोखाळत या चित्रपटाने अनोखे धाडस केले आहे. अर्थात, शेवटपर्यंत तग धरता आला, तरच या भन्नाट शेवटाची कमाल अनुभवता येईल.पाण्याखाली चित्रित केलेले गाणे हाच काय तो या चित्रपटातला आकर्षणाचा भाग आहे, तसेच शीर्षक गीतासह यातली गाणी जमून आली आहेत, परंतु त्याचा फायदा चित्रपटाला उचलता आलेला नाही. दिग्दर्शक जगदीश वाठारकर यांनी या चित्रपटातून फार काही वेगळे देण्याचा प्रयत्न केलेला नाही. चित्रपटाचा नायक देवेंद्र चौगुले (प्रेम) याने स्टंट्स वगैरे करण्यात आणि प्रेमाची भाषा सदोष उच्चारांतून पोहोचवण्यात धन्यता मानली आहे. रूपाली कृष्णराव (प्रीती) या नायिकेनेच काय तो अभिनयाचा कैवार घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, प्राची लालगे वगैरे कलावंतांनी बऱ्यापैकी साथ दिली आहे. हा साधारण मसालेबाज पद्धतीचा चित्रपट असला, तरी मुळात, आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार, याचे उदाहरण कायम करण्यात मात्र, हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.
मराठी ताटात हिंदी मसाला!
By admin | Published: March 04, 2017 2:41 AM