बाहुबलीच्या अपार यशानंतर हिंदी व साऊथमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या चित्रपटांची जणू रांग लागली आहे. व्हिज्युएल इफेक्टस्चा वापर करीत हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज करू पाहत आहेत. या क्रमात हिंदीसोबतच तेलगू, तामिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपट मोठ्या प्रमाणावर येत आहेत. इतिहासाचा संदर्भ घेऊन कॉम्प्युटरद्वारा तयार करण्यात आलेल्या प्रतिमांचा (सीजीआय इफेक्टस्) बाहुबली या चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे. आता लवकरच बाजीराव-मस्तानी येत आहे. या सर्व चित्रपटांकडून चित्रपट रसिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. कुठले आहेत हे चित्रपट बघू या...दिग्दर्शक गुणशेखर यांचा रुद्रम्मादेवी हा तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतील चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. अनुष्का शेट्टी, अल्लू अर्जुन, राणा दागुबत्ती, विक्रमजीत विर्क आणि प्रकाशराज यांचा या चित्रपटात समावेश आहे. युद्धाचा प्रसंग, अरेना अॅनिमेशन आणि हवेतून घेतलेली दृश्ये अंगावर रोमांच उभी करणारी आहेत. तमिळ अभिनेता विजय याचा पुली (वाघ) हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रोजी प्रदर्शित होत आहे. २० आॅगस्ट रोजी याचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला. सुदीप, प्रभू, श्रीदेवी, श्रुती हसन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पाच कॉस्चुम डिझायनर्स, चार स्टंट कोरिओग्राफर यांचा समावेश आहे. विजय हा एकाच वेळी १००० जणांशी लढताना या चित्रपटात दाखविण्यात आलाय. सुमारे २२०० व्हीएफएक्सचा समावेश असणाऱ्या या चित्रपटात तमिळ अभिनेता विजय आणि कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा असेल. बाहुबलीचे रेकॉर्ड तोडण्याचा पुलीचा प्रयत्न असणार आहे.हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहनजोदडो हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होत आहे. ए.आर. रहमानचे संगीत आणि व्हीएफएक्स इफेक्टमुळे या चित्रपटाविषयी सर्वांनाच अपेक्षा असणार आहेत. आशुतोषने यासाठी पुरस्कार विजेत्या व्हीएफएक्स सुपरवायझर कॅलेन गुलोकॉस यांची निवड केली आहे.
हिंदी, दाक्षिणात्य सिनेमा पुन्हा ऐतिहासिक युगाकडे
By admin | Published: August 21, 2015 11:15 PM