Anita Hassanadani : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानीने मालिकांसोबत चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या अनिताने एका मुलाखती दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
नुकतीच अभिनेत्रीने 'Hauterrfly' दिलेल्या मुलाखतीत तिच्या शालेय जीवनात घडलेल्या एका प्रसंगावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत अनिता म्हणाली, "जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा आई आम्हाला रिक्षातून शाळेत जाण्यासाठी नेहमी १० रूपये द्यायची. घरी येताना आम्ही तेव्हा चालत यायचो. शिवाय शाळेच्या कॅन्टिनमध्ये आम्ही समोसा किंवा इतर काही खाणं टाळायचो आणि पैसे वाचवायचो. तेव्हा माझं वय ९ ते १० वर्ष इतकं असेल. "
पुढे अभिनेत्री म्हणाली, "जेव्हा आम्ही घरी यायचो त्यावेळेस एक रिक्षावाला कायमच आमच्या वाटेत उभा असायचा. असं तो नेहमीच करायचा. जेव्हा आम्ही शाळेतून घरी चालत यायचो तेव्हा तो रिक्षावाला नेहमीसारखाच सेम पोझिशनमध्ये रस्त्यात उभा राहायचा. नंतर तो त्याचे कपडे काढून आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत विचित्र गोष्टी करत असे. त्याचं असं वागणं पाहून आम्ही रस्ता बदलण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे मी प्रचंड घाबरले होते. पण, तरीही आमच्या मनात ही भीती कायम असायची की त्याला सगळे रस्ते माहित होते आणि त्यामुळे शाळेच्या आवारात जर एखादा रिक्षा आम्हाला दिसला तरी मनात भीती निर्माण व्हायची". असा धक्कादायक खुलासा अनिता सनंदानीने केला.
अनिताने आत्तापर्यंत टीव्हीच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'मोहब्बतें', 'काव्यांजलि', 'नागीन' अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.