Join us

तर पाकिस्तानात जा...! हिंदुस्तानी भाऊ संतापला, ‘टीम इंडिया’ला शिवीगाळ करणाऱ्या विरोधात थेट पोलिसात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 1:22 PM

‘बिग बॉस’ फेम विकास फाटक अर्थात Hindustani Bhau सध्या जाम संतापला आहे. होय, हिंदुस्तानी भाऊ इतका संतापला की, तक्रार घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोहोचला

‘बिग बॉस’ फेम विकास फाटक अर्थात हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) सध्या जाम संतापला आहे. होय, हिंदुस्तानी भाऊ इतका संतापला की, तक्रार घेऊन थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. टीम इंडियाला (Team India ) शिव्या घालणाऱ्या एका व्यक्ती विरोधात त्याने खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केलाय.  भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर काही लोकांनी आनंद साजरा केला. फटाके फोडत जल्लोष साजरा केला.  भारतीय संघाच्या पराभवानंतर आनंद साजरा करत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या अशाच एका व्यक्ती विरोधात हिंदुस्तानी भाऊ पोलिसांत पोहोचला.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारतातील काही लोकांनी टीम इंडियाच्या पराभवानंतर फटाके फोडत जल्लोष साजरा केला. यादरम्यान मालवणीमधील हसन कोटी या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर करत टीम इंडियावर टीका केली होती. इतकंच नाही तर माझा पाकिस्तानला पाठींबा असून मुंबई पोलिस माझं काहीही बिघडवू शकतं नाही, अशी मुजोरीची भाषा त्यानं केली होती. याच हसन कोटीविरोधात  हिंदुस्तानी भाऊने पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

 पाकिस्तानचं कौतुक करत असाल तर पाकिस्तानमध्ये जा...भारतात राहून पाकिस्तानला पाठींबा देणाऱ्या लोकांना हिंदुस्तानी भाऊनं चांगलंच  सुनावलं.  याच देशात खाऊन पाकिस्तानचं कौतुक करत असाल तर पाकिस्तानात जाऊन राहा. या देशात तुमचं काहीही काम आहे. या लोकांना पाकिस्तानच्या विजयाचा नाही तर भारताच्या पराजयाचा जास्त आनंद झाला आहे.   या लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली. यांना वेळीच उत्तर देणं गरजेचं आहे, असं हिंदुस्तानी भाऊ मीडियाशी संवाद साधताना म्हणाला.

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?हिंदुस्तानी भाऊचं खरं नाव विकास फाटक.  पुलवामा हल्ल्यानंतर भारताविरोधात बोलणा-यांना चपराक लगावण्यासाठी विकासनं एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यानं ‘हिंदुस्थानी भाऊ’या नावानं व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. बिग बॉस 13 मध्ये त्याने  वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून प्रवेश केला होता. बेधडक स्वभावामुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला होता. सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात 20 रुपये रोजानं बॉलबॉयची पहिली नोकरी करून त्यानंतर बारमध्ये वेटर म्हणून काम करत त्याने मोठा स्ट्रगल केला. मराठमोळा विकास जयराम फाटक हा जन्मानं मुंबईकर असून. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा यांच्यासह मुंबईत राहतो.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ