मुंबई - घरात कार्यक्रम होता, त्यामुळे रात्री उशिरा झोपलो. सकाळी झोपेत असताना गोळीबाराच्या आवाजाने जाग आली. बाहेर येऊन बघितले तर गॅलरीत बुलेटच्या खुणा होत्या. बिश्नोई टोळीकडून यापूर्वी धमक्या आल्या होत्या. मात्र, यावेळी मारण्याच्या हेतूनेच ते आले होते. जिवाला धोका होता; पण पोलिसांमुळे वाचलो, असे बॉलिवूडस्टार सलमान खान याने गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
गुन्हे शाखेने या प्रकरणात सलमान खानसह अरबाज खानचा जबाब नोंदवला आहे. दुसरीकडे गोळीबार प्रकरणातील मास्टरमाइंड कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आणण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
गुन्हे शाखेने सागर पाल, विकीकुमार गुप्ता, सोनूकुमार बिश्नोई, अनुज थापन आणि मोहम्मद रफिक चौधरी यांना अटक केली आहे. यातील आरोपी अनुज थापन याने १ मे रोजी मुंबई पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. गुन्ह्यातील पुरावे आणि चौधरीकडे केलेल्या तपासात हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील रहिवासी हरपाल याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला. टोळीतील हरपाल सिंग ऊर्फ हॅरी याला हरियाणातून अटक केली आहे.
विचारले दीडशे प्रश्न गुन्हे शाखेने नुकताच सलमान खान आणि अरबाज खान यांचा जबाब नोंदवला. पोलिस पथकाने सलमानच्या घरी जाऊन चार ते साडेचार तास माहिती घेऊन सुमारे नऊ पानांचा जबाब नोंदवला, तर अरबाजकडून अडीच तास माहिती घेऊन जबाब नोंदवला. दोघांना सुमारे दीडशे प्रश्न विचारण्यात आले.मास्टरमाइंडचे काय? या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तो सध्या अहमदाबादमधील साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. बिश्नोईला आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मुंबईत आणण्याच्या दृष्टीने पथकाने प्रयत्न सुरू केल्याचे समजते.अरबाजचाही जबाब गोळीबाराच्या दिवशी अरबाज खान त्याच्या जुहुतील घरी होता. मात्र, यापूर्वी खान कुटुंबीयांना आलेल्या धमक्यांच्या अनुषंगाने त्याचाही जबाब नोंदविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.