छंद किंवा एखादी अपूर्ण राहिलेली इच्छा हे फक्त सामान्य माणसाच्याच आयुष्यात घडते असे नाही. लहान असतो तेव्हा मनात खूप काही ठरवलेले असते आणि बालपणी आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न करतोही. कोणी संग्रह करतं, कोणी एखादा छंद जोपासतं. अक्षरश: इतके की, ‘हा छंद जिवाला लावी पिसे’. पण नोकरी, शिक्षण अशा पसाऱ्यात या गोष्टी काहीशा भूतकाळात जमा होतात आणि मागे राहते ती केवळ खंत. या गोष्टींना कॉमन मॅनसारखेच सेलीब्रिटीदेखील अपवाद नाहीत. अभिनेता-अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नांमध्ये इच्छा आणि स्वप्नांचा झोका उंच जात नाही यावरच काही सेलीब्रिटी आपल्या अपूर्ण इच्छा-आकांक्षा शेअर करत आहेत सीएनएक्सशी. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायचा छंद : मला लहानपणापासूनच गाणं शिकायची खूप इच्छा होती. मी शिकायला सुरुवातही केली होती, पण काही कारणांमुळे ते स्वप्न अपूर्ण राहिलं. माझी आई स्वत: लाइट म्युझिक उत्तम गाते. तिच्यामुळेच मी गाणं शिकण्यासाठी प्रेरित झाले होते. ती गाणं गुणगुणायची आणि मला ते ऐकत ऐकतच वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायची सवय लागली. त्यामुळे आता गाणं शिकता आलं नसलं तरी मी जे समोर येईल ते म्हणजे लाइट, क्लासिकल, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल, ठुमरी अशा सगळ्या प्रकारची गाणी ऐकते. - स्पृहा जोशी, अभिनेत्री शिक्षण क्षेत्रात यायला आवडले असते : मी एक अभिनेता आहे पण मला डान्स करायला खूप आवडतो आणि अॅक्टिंगच्या माध्यमातून ती इच्छा पूर्णही होते. मात्र मी या क्षेत्रात आलो नसतो तर मला शिक्षक व्हायला नक्कीच आवडले असते. आमच्याकडे तशी परंपराच आहे, असे म्हटले तरी चालेल. माझे बाबा प्रोफेसर होते, त्यामुळे त्यांच्याकडील जीन्समधूनच ते माझ्यात आले आहे. ते आडनावाप्रमाणेच तत्त्वांना जोपासून होते. ते म्हणायचे की, कोणताही निर्णय घेताना दोनच मार्ग असतात, एक तर बरोबर नाही तर जो मिळेल तो... त्यामुळे आपण कायम बरोबर मार्गानेच चालले पाहिजे, याबद्दल ते कायमच आग्रही होते. त्यामुळे मीदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शिक्षण क्षेत्रात जाणे पसंत केले असते.- वैभव तत्त्ववादी, अभिनेतामोहम्मद रफींच्या गाण्यांचे कलेक्शन : मी एक अभिनेता असलो तरी मला गाणी ऐकायला फार आवडतं. शूटिंगमध्ये कितीही बिझी असलो तरी वेळात वेळ काढून मी गाणी ऐकण्याचा छंद जोपासतो. मोहम्मद रफी माझे फेव्हरेट गायक आहेत आणि त्यांच्या सगळ्या गाण्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे. त्यामुळे जसा वेळ मिळेल तशी मी त्यांची गाणी ऐकतो. त्यामुळे मला फ्रेशही वाटते आणि नव्या उत्साहाने कामाला लागतो. गाणी ऐकण्याबरोबरच त्या गाण्यांचे व्हिडीओ बघायलाही मला खूप आवडते. कितीही वेळा बघितले तरी त्याचा मला कंटाळा येत नाही तर आनंदच मिळतो. - स्वप्निल जोशी, अभिनेतापायलट न होता आल्याची खंत : मी आज दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलो असलो तरी मला खरे तर पायलट व्हायचे होते. पायलट न होता आल्याची मला आजही खंत आहे. माझ्याकडे खूप पैसे आले तर मी स्वत: एक पायलेट जेट नक्की विकत घेईन आणि त्याचे प्रशिक्षणही घेईन. मी आजही विमानाने प्रवास करताना विंडो सीटचा अट्टहास धरतो, कारण मला विमान टेक आॅफ करताना पाहायला प्रचंड आवडतं. - केदार शिंदे, दिग्दर्शक फॅशन डिझायनर होण्याची होती इच्छा : अभिनयाव्यतिरिक्त मला ड्रॉइंग, स्वयंपाक, डिझायनिंग करायला फार आवडतं. लहानपणापासूनच ड्रॉइंगची आवड असल्याने डिझाइनची जाण होती. फॅशन डिझायनर होण्याची इच्छा होती, पण तेव्हा ते जमलं नाही. त्यामुळे आता मी त्यासाठी आवर्जून वेळ देते आणि इतकचं नाही तर मी नुकताच ‘तेजाज्ञा’ हा ब्रँड सुरू केला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळत आहे. - तेजस्विनी पंडित, अभिनेत्रीकॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन आॅफिसर व्हायचे होते : मी कॉलेजमध्ये असताना मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन आयएएस, आयपीएस बनायची खूप इच्छा होती. मी आर.एस.पी. मध्ये असताना पुण्याची कमांडर होते. त्यामुळे या परीक्षा देऊन देशासाठी काही तरी करायला पाहिजे, असं वाटायचं. पण ती इच्छा पूर्ण झाली नाही. केवळ चित्रपटांमध्येच पोलिसाचे रोल साकारण्यात समाधान मानायला लागलं. ही इच्छा असण्यामागे कारण म्हणजे तेव्हा आयपीएस आॅफिसर किरण बेदींचा संपूर्ण देशात खूप दरारा होता आणि आजही आहे. त्यामुळे मी त्यांना आदर्श मानायचे. देशासाठी, समाजोपयोगी कामे करून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे वाटायचे. - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
हा छंद जिवाला लावी पिसे
By admin | Published: October 07, 2015 4:53 AM