Join us

Holi 2023 : बॉलिवूडमध्ये कसा आणि कधी सुरु झाला होळीचा ट्रेंड? कोणत्या सिनेमात खेळली गेली पहिली होळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 8:00 AM

Holi 2023 : बॉलिवूड आणि होळीचं गहिरं नातं आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांत रंगांची उधळण दाखवण्यात आली आहे. पण बॉलिवूडमध्ये होळीचा ट्रेंड कसा सुरू झाला माहितेय?

Holi 2023 : भारतात होळीचा सण जल्लोषात साजरा केला जातो. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा होतो. बॉलिवूडची होळीची गाणी या रंगांच्या सणाची मजा आणखीनच वाढवते. होळीच्या गाण्यांशिवाय धुळवडीचा आनंद अपूर्ण आहे, असंही म्हणता येईल. बॉलिवूड आणि होळीचं गहिरं नातं आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांत रंगांची उधळण दाखवण्यात आली आहे. पण बॉलिवूडमध्ये होळीचा ट्रेंड कसा सुरू झाला माहितेय? यामागे कुणाचा हात होता माहितेय? तर आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

होय, होळी सण दाखवला गेलेला सर्वात पहिला सिनेमा स्वातंत्र्यापूर्वी प्रदर्शित झाला होता. ते साल होतं 1940चं. यावर्षी ‘औरत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यातच पहिल्यांदा होळीचा सण साजरा करताना दाखवण्यात आला होता. महबूब खान हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. अर्थात हा एक ब्लॅक ॲण्ड व्हाईट सिनेमा असल्याने या चित्रपटात होळी साजरी झाली असली, तरी यात रंग पाहायला मिळाले नव्हते. सरदार अख्तर, सुरेंद्र, याकुब आणि कन्हैया लाल असे अनेक कलाकार या सिनेमात होते.  1957मध्ये मेहबूब खान यांनी ‘औरत’चा रिमेक बनवला. याचं नाव होतं,‘मदर इंडिया’. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातही होळी साजरी करताना दाखवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, कलर सिनेमा असल्याने यात रंगीत होळी दिसली होती. अर्थात ‘मदर इंडिया’ आधीही पडद्यावर रंगीत होळी खेळली गेली होती.

1952 मध्ये पडद्यावर दिसली रंगीत होळी...1952मध्ये बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा रंगीत होळी खेळली गेली. बॉलिवूडच्या पडद्यावर खेळली गेलेली ही पहिली रंगीत होळी होती. चित्रपटाचं नाव होतं ‘आन’. मेहबूब खान हेच या सिनेमाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटात दिलीप कुमार आणि निम्मी होळी खेळताना आणि धमाल करताना दिसले होते. यानंतर अनेक चित्रपटात होळी खेळताना दाखवलं गेलं. पण बॉलिवूडमध्ये होळी खेळण्याचे संपूर्ण श्रेय मेहबूब खान यांना जातं, हे मात्र नक्की.  

टॅग्स :होळी 2023बॉलिवूड