Join us

Robbie Coltrane Passes Away: हॅरी पॉटरचा ‘रुबियस हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड; अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 7:55 AM

रॉबी कोल्ट्रेन यांच्या निधनावर हॉलिवूडच्या कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी तसेच चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Robbie Coltrane Passes Away: हॉलिवूडमधील प्रचंड गाजलेली चित्रपटांची सीरिज म्हणजे हॅरी पॉटर. ही सीरिजने लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. मात्र, याच हॅरी पॉटर सीरिजमध्ये रुबियस हॅग्रिड पात्र साकारणारे अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी रॉबी कोल्ट्रेन यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॅरी पॉटरचे चाहते, हॉलिवूड आणि अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे.  

रॉबी कोल्ट्रेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉबी कोल्ट्रेन यांची एजंट बेलिंडा राइट यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. यावेळी राइट यांनी रॉबी यांच्याबरोबरच्या काही आठवणींना उजाळा दिला. हॅग्रिड या पात्राच्या माध्यमातून त्यांनी केवळ लहान मुलांच्या नव्हे तर मोठ्यांच्याही चेहऱ्यावर हसू आणले, असे सांगत या कठीण परिस्थितीमध्ये प्रेक्षकांनी रॉबी यांच्या कुटुंबीयांना त्यांचा खासगी वेळेत तसदी देऊ नये, अशी विनंतीही राइट यांनी केली आहे. रॉबी यांच्या जाण्याने हॉलिवूडच्या कलाकारांनी तसेच तेथील राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

‘रुबियस हॅग्रिड’ या पात्रामुळेच खरी ओळख मिळाली

अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांना ‘हॅरी पॉटर’ सीरिजमधील ‘रुबियस हॅग्रिड’ या पात्रामुळेच खरी ओळख मिळाली. त्यांना याच नावाने ओळखले जात होते. हॅरी पॉटरशिवाय रॉबी कोल्ट्रेन अनेक चित्रपटांमध्ये झळकले होते. रॉबी कोल्ट्रेन एक उत्तम लेखक होते. रॉबी कोल्ट्रेन एक उत्कृष्ट अभिनेते होते. सलग तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार जिंकल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले होते. हॅरी पॉटर चित्रपटातील हॅग्रिडच्या भूमिकेमुळे येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या ते लक्षात राहतील. जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही भूमिका होती, असे एका निवेदनात म्हटले आहे. 

विनोदी अभिनेता म्हणून अभिनयाला सुरुवात

रॉबी कोल्ट्रेन यांचा जन्म ३० मार्च १९५० रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला होता. त्यांचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा रॉबी यांनी अभिनयविश्वात नशीब आजमवायचे ठरवले, तेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. रॉबी कोल्ट्रेन यांनी विनोदी अभिनेता म्हणून अभिनयाला सुरुवात केली. ‘हॅरी पॉटर’ या चित्रपट सीरिजमध्ये त्यांनी साकारलेले हॅग्रिड हे पात्र मुख्य पात्रांपैकी एक होते. या चित्रपटातील शरीराने भव्यदिव्य दिसणारा हॅग्रिड छोट्या-छोट्या गोष्टींवरून भावूक व्हायचा. लहान मुलांची विशेषतः हॅरीची काळजी घेणारा हॅग्रिड बच्चे कंपनीमध्येही लोकप्रिय होता. या भूमिकेतील कॉमिक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 

दरम्यान, 'हॅरी पॉटर' व्यतिरिक्त, ते ITV चा सस्पेन्स शो 'क्रॅकर' आणि जेम्स बाँड चित्रपट 'गोल्डनी' आणि 'द वर्ल्ड इज नॉट इनफ' मध्ये रॉबी यांनी भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर’शिवाय रॉबी अनेक चित्रपटांमध्ये झळकले होते. चित्रपटांनंतर रॉबी टीव्ही क्षेत्राकडे वळले होते. त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :हॉलिवूड