कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. काहीजणांचे तर खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक गरीब लोकांवर तर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे. आता या सगळ्यात एक अभिनेत्री लोकांची मदत करण्यासाठी पुढे आली आहे.
हॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली ही नेहमीच काही ना काही समाजकार्य करत असते. कोरोना व्हायरसच्या थैमानानंतर अमेरिकेत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे खाण्याचे हाल होत आहे. त्यामुळे तिने एका संस्थेला तबब्ल एक मिलियन अमेरिकन डॉलरची म्हणजेच सात कोटी ५० हजार रुपयांची मदत केली आहे. इ न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, अँजेलिना जोलीने नो किड हंग्री या संस्थेला तब्बल एक मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच सात कोटी 50 लाख रुपये दिले आहेत. ही संस्था गरिबांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करते. पण सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत या संस्थेवर आर्थिक ताण येत आहे आणि त्याचमुळे अँजेलिनाने या संस्थेला इतकी मोठी रक्कम मदत म्हणून दिली आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे.