जगभरात मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्रींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले होते. या मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्याय व अत्याचाराबाबत बेधडकपणे बोलू लागल्या होत्या. नुकतेच एका हॉलिवूड अभिनेत्रीनं देखील तिच्यासोबत घडलेल्या एक वाईट अनुभव शेअर केला आहे. ती महाविद्यालयात शिकत असताना तिला अत्यंत वाईट अनुभव आला होता. ही अभिनेत्री म्हणजे नेटफ्लिक्सवरील रिवरडले (Riverdal) सीरिजमधील अभिनेत्री कॅमिला मेंडेस आहे.
हॉलिवूड अभिनेत्री कॅमिला मेंडेसनं एका वुमन हेल्थ मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले. तिने सांगितले की, मी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये टिश्क स्कूल ऑफ द आर्ट्सचं शिक्षण घेत होते. त्यावेळी कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं होतं.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, कॅमिलानं कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा अनुभव शेअर केला. कॉलेजचं पहिलं वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेलं. मला त्या वर्षात बरेच वाईट अनुभव आले. एका व्यक्तीनं ड्रग्स देऊन माझं शारीरिक शोषण केलं होतं, असं कॅमिलानं सांगितलं.
ती पुढे म्हणाली, त्यावेळी मी ठरवलं की माझं आयुष्य सुरक्षित आणि सुसह्य करण्यासाठी मला होतील तेवढे प्रयत्न मी करणार. या घटनेनंतर कॅमिलानं स्वतःच्या पाठीवर 'टू बिल्ड अ होम' असा टॅटू बनवून घेतला.
कॅमिला सांगते, 'हा टॅटू मला आठवण करुन देतो की, स्वतःसोबतच मला माझ्या आसपासच्या लोकांनाही आणि विशेषतः मुलींना खंबीर बनवायचं आहे. मी माझ्या चाहत्यांसाठी आदर्श व्यक्ती होऊ इच्छिते. मला खाण्याच्या सवयींमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरुकता पसरवायची आहे. कारण हे कॉलेजच्या वयात खूप गरजेच असतं असं मला वाटतं'
कॅमिला पुढे म्हणाली, मी एक अशी टीनएजर होते जिच्याकडे बॉडी आणि सकारात्मकतेसाठी कोणीही रोल मॉडेल नव्हतं. त्यावेळी या अशाप्रकारच्या घटनांवर कोणीही उघडपणे बोलत नसे. तसेच त्यावेळी स्लिम असणं हे सुंदरतेच लक्षण मानलं जात असे. तुम्ही कसे दिसता यापेक्षी चांगली हेल्थ असणं खूप गरजेचं आहे. आपण अशा गोष्टी कराव्या ज्या आपल्यासाठी योग्य आहेत. आपल्या शरीरासाठी योग्य आहेत.