Join us  

गिब्सनच्या अनुसार, तो चांगला बाप नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2016 6:20 PM

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्सनने सांगितले की, एक वडील म्हणून त्याच्याकडून रोज काही ना काही चुका होत असतात. त्यामुळे मी ...

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्सनने सांगितले की, एक वडील म्हणून त्याच्याकडून रोज काही ना काही चुका होत असतात. त्यामुळे मी अजूनही चांगला बाप होवू शकलो नाही, असे त्याला वाटत आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गिब्सनला दोन पत्नींपासून आठ मुले आहेत. ६० वर्षीय गिब्सन म्हणतो की, कोणालाही आदर्श आई-वडील होता येत नाही. कारण तुम्हाला तुमच्या मुलांवर रागावावेच लागते. मी जेव्हा-केव्हा चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा माझ्याकडून काही ना काही चुका होत असतात. मात्र यामुळे निराश न होता, मी स्वत:ला एक चांगला वडील म्हणून असलेल्या जबाबदाºया उत्तमरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो. पुढे बोलताना गिब्सनने सांगितले की, खरं तर वडील म्हणून सर्वच लोक त्रस्त असतात. आदर्श आई-वडील असा कुठेही प्रकार नसतो, कारण आदर्श आई-वडील होण्याच्या प्रयत्नात सगळ्यांकडूनच चुका होत असतात. चांगली बाब म्हणजे इतरांच्या तुलनेत मी खूपच कमी चुका करतो. गिब्सन त्याच्या खासगी आयुष्याला कंटाळून चंदेरी दुनियेपासून दूर गेला आहे. तेव्हापासून तो मुलांसमवेत वेळ व्यतीत करीत आहे. त्याला सार्वजनिक जीवनात परतायला अजिबात रस राहिलेला नाही. तो केवळ मुलांच्या देखभालीकडे सध्या लक्ष देत आहे. आदर्श वडील कसे बनता येईल यासाठी त्याचा सातत्याने प्रयत्न असतो. मुलांसाठी तो त्याच्या करिअरवर पाणी सोडण्याच्या विचारात आहे. गेल्या काही वर्षांपासून तो पडद्यापासून दूर झाल्याने गिब्सन परतणार की नाही, याबाबत मात्र नेहमीच तर्कवितर्क काढले जातात.