कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प राहाणार आहे. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नुकतेच कोरोना व्हायरसने निधन झाले आहे.
हॉलिवूड सुपरस्टार मार्क ब्लम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्यांचे निधन झाले आहे. याविषयी त्यांच्या पत्नीनेच प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मार्क यांची पत्नी जॅनेट जैरिशने एका इमेलद्वारे ही बातमी सांगितली आहे. या इमेलमध्ये तिने लिहिले आहे की, माझ्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत होती. या व्हायरसचा त्यांच्या शरीरात शिरकाव झाल्याने त्यांचे निधन झाले असून त्यांनी या जगाचा नुकताच निरोप घेतला.
मार्क ६९ वर्षांचे होते. त्यांचे निधन न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात झाले. मार्क यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षं राज्य केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्य काम केले आहे. ते काही महिन्यांपूर्वीच नेटफ्लिक्सच्या 'यू' या वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या वेबसिरिजचे दोन सिझन आले असून तिसऱ्या सिझनची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना मार्क यांची कमतरता जाणवेल यात काहीच शंका नाही.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.