Join us

या प्रसिद्ध अभिनेत्यानंतर आता त्याच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:20 PM

या अभिनेत्याला काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देइडरिसची पत्नी सब्रीनाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिनेच सांगितले आहे. इडरिसला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने त्याच्यापासून काही दिवस दूर राहावे असा सल्ला डॉक्टरांनी तिला दिला होता.

कोराना व्हायरसने हजारोंचे बळी घेतले. लाखो लोकांना ग्रासले. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत कुणीही यातून सुटलेले नाही. हॉलिवूडमध्येकोरोनाने ग्रासले आहे. काही दिवासांपूर्वी हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर ‘जेम्स बॉन्ड’ची अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्को आणि ब्रिटीश अभिनेता इडरिस एल्बा यालाही कोरोनाची लागण झाली होती. आता इडरिसच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

इडरिसची पत्नी सब्रीनाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिनेच सांगितले आहे. इडरिसला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने त्याच्यापासून काही दिवस दूर राहावे असा सल्ला डॉक्टरांनी तिला दिला होता. पण त्याची काळजी घेण्यासाठी ती सतत त्याच्यासोबतच होती. त्यामुळे कोरोनाचा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला अजिबातच धक्का बसला नसल्याचे तिने सांगितले. 

एल्बाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने म्हटले होते की, ‘आज सकाळी मी चाचणी केली आणि त्यातून मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. आत्तापर्यंत माझ्यात या आजाराची कुठलीही लक्षणे नाही. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर मी आयसोलेट झालो आहे आणि एकांतात वेळ घालवतो आहे. मित्रांनो घरी राहा, सावध राहा. पॅनिक होऊ नका,’ असे त्याने या व्हिडीओतसोबत लिहिले होते. ‘हे सगळे गंभीर प्रकरण आहे. अनेकांमध्ये लक्षणे नाहीत. पण ते व्हायरस पसरवत आहेत. एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याचे कळताच मी टेस्ट केली आणि मलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले,’ असे एल्बाने व्हिडीओद्वारे सांगितले होते.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या