Join us  

​‘लंचबॉक्स’ दिग्दर्शक रितेश बत्राचा असादेखील सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2016 3:13 PM

इरफान खान, निम्रत कौर आणि नवाजुद्दिन सिद्दिकी स्टारर ‘लंचबॉक्स’ (२०१३) या सिनेमाने सर्वांनाच पे्रमात पाडले. जेवणाच्या डब्यातून अनोळखी व्यक्तीला ...

इरफान खान, निम्रत कौर आणि नवाजुद्दिन सिद्दिकी स्टारर ‘लंचबॉक्स’ (२०१३) या सिनेमाने सर्वांनाच पे्रमात पाडले. जेवणाच्या डब्यातून अनोळखी व्यक्तीला लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधून सुरू होणारी ही तरल प्रेमकथा अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये गाजली.दिग्दर्शक रितेश बत्राचेसुद्धा खूप कौतुक झाले. त्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ‘व्हेराईटी’ नावाच्या मॅगझीनने नव्या दमाच्या पहिल्या १० दिग्दर्शकांची यादी तयारी केली आहे. आगामी काळात या दिग्दर्शकांचे सिनेमे पाहणे गरजेचे आहेत असा त्याचा अर्थ आहे. त्यामध्ये रितेशचा समावेश करण्यात आला आहे. येत्या ३ जानेवारीला प्रकाशित होणाऱ्या एका स्पेशल अंकात सर्व दहा दिग्दर्शकांच्या प्रोफाईल प्रकाशित केल्या जाणार आहेत. तसेच कॅलिफोर्नियामध्ये होणाऱ्या ‘पाम स्प्रिंग फिल्म फेस्टिव्हल’मध्येसुद्धा त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.वीस वर्षांपूर्वी अशीच यादी तयार करण्यात आली होती ज्यामध्ये क्रिस्टोफर नोलन, वेस अँडरसन, अल्फॉन्सो क्युरॉन, अलेहांद्रो गोंझालिझ इनिरितू आणि ताईका वैटिटी यासारख्या नामवंत दिग्दर्शकांचा समावेश होता. ते प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वी नव्वदच्या दशकात ही लिस्ट बनवण्यात आली होती.द सेन्स आॅफ अ‍ॅन एन्डिंग : शार्लेट रॅम्पलिंग आणि जिम ब्रॉडबेंट ‘द लंचबॉक्स’च्या तुफान यशानंतर रितेश आता ‘द सेन्स आॅफ अ‍ॅन एन्डिंग’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. ब्रिटिश लेखक ज्युलियन बार्न्सच्या त्याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. २०११ साली या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला होता. भूतकाळात केलेल्या गोष्टींचा उतार वयात अर्थ लावणाऱ्या टोनी नावाच्या पात्राची ही गोष्ट आहे.प्रसिद्ध नाटककार निक पेनने पटकथा लिहिलेली असून जिम ब्रॉडबेंट आणि शार्लेट रॅम्पलिंग प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची शूटींग पूर्ण झालेली असून सध्या पोस्ट-प्रोडक्शनवर रितेश काम करीत आहे.