सिनेमाच्या लांबीबद्दल वेगवेगळी मते असू शकतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात सिनेमाची लांबी दिवसेंदिवस कमी होतेय. म्हणूनच आधी तीन ते साडेतीन तासांचे सिनेमे असायचे. आता ही वेळ जास्तीत जास्त २ ते 2.30 तासांपर्यंत आली आहे. अशात एक चित्रपट 30 दिवसांचा आहे, असे कुणी सांगितले तरी अनेकांचा विश्वास बसायचा नाही. पण हे खरे आहे. होय, या चित्रपटाचा ट्रेलरच 7 तास 20 मिनिटांचा आहे. तर संपूर्ण चित्रपटाची लांबी 720 तास इतकी आहे. म्हणजे समजा एप्रिलमध्ये हा चित्रपट सुरु झाला तर मे महिन्यात संपायचा.
2020 मध्ये हा हॉलिवूड 720 तासांचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘अॅम्बियंन्स’. या चित्रपटाची कथा दोन कलाकारांच्या संबंधावर आधारित आहे. स्वीडनच्या समुद्राकाठी हे दोघे भेटतात, त्यांचीच ही कथा. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सिंगल शॉटमध्ये या चित्रपटाचे शूटींग झाले आहे आणि यात कुठलाही कट नाही.2014 मध्ये या चित्रपटाचा पहिला टीजर आला होता. तो 72 तासांचा होता. यानंतर 2016 मध्ये याचा पहिला शॉर्ट ट्रेलर लॉन्च झाला होता. तो 7 तास 20 मिनिटांचा होता. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून याचे शूटिंग सुरू आहे.
अॅम्बियंन्स नावाचा हा चित्रपट स्वीडिश दिग्दर्शक अँडर्स वेबर्ग यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. प्रायोगिक चित्रपट म्हणून या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय जुन्या, बॉक्स आॅफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांचे रिमेक करण्याच्या ट्रेंडचा निषेध म्हणून हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याची एकमेव कॉपी नष्ट करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर या सिनेमाचा केवळ एकच शो होणार आहे. ‘अस्तित्वात नसलेला सर्वात जास्त लांबीचा चित्रपट’ अशी ओळख या चित्रपटाला मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. हा एक आगळावेगळा विक्रम असणार आहे. इतक्या मोठ्या लांबीचा चित्रपट 31 डिसेंबर 2020 ला प्रदर्शित होणार आहे.