हॉलीवूड चॉकलेट हीरो अॅश्टन कुचरचा आज वाढदिवस. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंतचा त्याचा प्रवास खरोखरंच कौतुकास्पद आहे. ‘दॅट्स सेव्हन्टीज शो’ या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या अॅश्टनला नेहमीच्या त्याच्या कॉमेडी भूमिकांसाठी ओळखले जाते. या मालिकेत त्याने ‘मायकल केल्सो’ नावाशी काहीशा बालिश आणि खुळचट व्यक्तीची भूमिका केली होती. त्याच्या कॉमेडी कौशल्यामुळे तो टीव्ही स्टार बनला. पण हीच लोकप्रियता त्याच्यातील गंभीर कलाकाराच्या इमेजसाठी मारक ठरली. एकाच प्रकारच्या भूमिकांसाठी त्याला विचारणा होऊ लागली. त्याने सिरीयस रोल केले तर सुरूवातीला प्रेक्षकांना त्याला अशा गंभीर स्वरुपात स्वीकारणे जरा जडच गेले. परंतु अॅश्टनने प्रयत्न सोडले नाही. एक उत्तम कॉमेडी व रोमॅण्टिक हीरो म्हणून यशस्वी असलेल्या अॅश्टनने वेळोवेळी त्याच्यातील ‘असली’ कलाकाराची झलक दाखवलेली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अशाच पाच चित्रपटांची नावे आम्ही तुम्हाला सुचवत आहोत जे पाहून तुमच्या मनातील त्याची केवळ विनोदी अभिनेता अशी ओळख मिटून तो एक सिरीयस कलाकार म्हणून समोर येईल.
तत्पूर्वी अॅश्टन कुचरला ‘सीएनएक्स मस्ती’कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
५. टेक्सास रेंजर (२००१)एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेच्या गृहयुद्धा दरम्यान घडणाऱ्या या वेस्टर्न चित्रपटात अॅश्टनने जॉर्ज डुरहॅम नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी चित्रपटाला नाकारले परंतु अॅश्टनच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. कोणाला अपेक्षाच नव्हती की, तो एवढा छान अभिनय करेल.
४. द गार्डियन (२००६)शारीरिक आणि मानसिकरीत्या अत्यंत अवघड अशी अव्हानात्मक भूमिका अॅश्टनने ‘द गार्डियन’मध्ये यशस्वीपणे साकारली. जलतरणपटू म्हणून सुखवस्तू करिअर सोडून अमेरिकेच्या नौसेनेमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या ‘जेक फिशर’च्या भूमिकेला त्याने पडद्यावर समर्थपणे जिवंत केले. केविन कोस्टनर आणि त्याची केमिस्ट्री या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले.
३. पर्सनल इफेक्ट्स (२००८)ही एक ड्रामा फिल्म असून कुचरने यामध्ये बहीणीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी प्रेरित भावाची भूमिका केली. त्याच्या पॉवरहाऊस परफॉर्मन्सनंतर निर्मात्याच्या असामार्थ्यमुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक कुचरच्या सर्वोत्तम अभिनयापासून मुकले.
२. जॉब्स (२०१३)अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘जॉब्स’ कदाचित अॅश्टन कुचरचा आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय चित्रपट असेल. जॉब्ससारखे दिसण्यापासून ते सशक्तपणे त्याची व्यक्तीरेखा पडद्यावर साकारण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर अॅश्टन ए-१ ठरला. एका मुलाखतीमध्ये अॅश्टन म्हणाला होता की, ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठी जोखिम होती.
१. द बटरफ्लाय इफेक्ट (२००४)अनेक समीक्षक आणि प्रेक्षकांच्या मते ‘द बटरफ्लाय इफेक्ट’या चित्रपटात त्याने करिअर बेस्ट अभिनय केला आहे. भूतकाळात केलेल्या छोट्या छोट्या चूकांचा भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो याचे उत्तम चित्रण या सिनेमात केलेले आहे. इव्हान (अॅश्टन) नावाचा कॉलेज विद्यार्थी टाईम ट्रॅव्हल करून भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी धडपड करीत असतो. महान समीक्षक रॉबर्ट ईबर्ट यांनी म्हटले होते की, अॅश्टनच्या प्रामाणिक अभिनयामुळे हा चित्रपट वेगळ्या उंचीवर गेला आहे.