Join us

Box Office : या चित्रपटाने महिनाभरात केली ६५ अब्जची कमाई; अनेक रेकॉर्ड तोडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 4:04 PM

या हॉलिवूडपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडत महिनाभरातच जगभरात तब्बल ६५ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात कमाई करणारा हा पाचवा चित्रपट ठरला आहे.

वॉल्ट डिजनी कॉर्पोरेशनच्या ‘ब्लॅक पॅँथर’ या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक करीत जगभरात दबदबा निर्माण केला आहे. चित्रपट रिलीज झाला तेव्हापासून आतापर्यंत या चित्रपटाने वल्डवाइड कलेक्शन तब्बल ६५ अब्ज रुपये इतके केले आहे. चित्रपटाने केलेल्या या कमाईची माहिती स्वत: डिजनीनेच शनिवारी सांगितली. वास्तविक डिजनीच्या एखाद्या चित्रपटाने पहिल्यांदाच अशाप्रकारची ऐतिहासिक कमाई केली असे नाही तर यापूर्वीही अनेक चित्रपटांनी जगभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. ‘ब्लॅक पॅँथर’ डिजनीचा १६ वा असा चित्रपट आहे, जगभरातील बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली. या अगोदर “The Avengers,” “Avengers: Age of Ultron,” “Iron Man 3” आणि “Captain America: Civil War” या चित्रपटांनीही चांगले प्रदर्शन केले आहे. भारतातही या चित्रपटाचा जोर स्पष्टपणे दिसून आला. केवळ तीनच दिवसांत चित्रपटाने १३ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. १६ फेब्रुवारी रोजी भारतात रिलीज झालेल्या या चित्रपटाने सिनेमागृहात अक्षरश: धूम उडवून दिली. वल्डवाइड कलेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा ‘ब्लॅक पॅँथर’ आतापर्यंतचा पाचवा चित्रपट ठरला आहे. ‘ब्लॅक पॅँथर’मध्ये कॅडविक बोसमॅन याने सुपरहीरोची भूमिका साकारली. या चित्रपटाला आतापर्यंतचा सर्वात मेगा लेव्हलचा मार्वेल चित्रपट म्हणून संबोधले जात आहे. कारण मार्वेल स्टुडिओजचा ‘ब्लॅक पॅँथर’ पहिला असा चित्रपट आहे, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत अश्वेत कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाल्यास, वकांडा नावाचा असा एक काल्पनिक देश दाखविण्यात आला आहे, ज्याच्या राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी शत्रूशी दोन हात करून ताकद मिळविण्याचा प्रयत्न करतो. याच दरम्यान, शत्रूच्या भीतीचे सावट संपूर्ण जगावर निर्माण होते. तेव्हा ब्लॅक पॅँथर नावाचा एक सुपरहीरो आपल्या टीमसोबत शत्रूचा सामना करण्यासाठी एका मिशनवर निघतो. हा चित्रपट अजूनही भारतात चांगले प्रदर्शन करत आहे. भारतीय प्रेक्षक चित्रपटातील सुपरहीरो आणि चित्रपटातील ग्राफिक्स इफेक्ट अधिक पसंत करीत आहेत.