अख्या जगाला वेड लावणा-या सुप्रसिद्ध BTS बँडच्या ‘बटर’ (Butter) या नव्या गाण्याने युट्यूबवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हे गाणे रिलीज झाले आणि चाहत्यांच्या या गाण्यावर अक्षरश: उड्या पडल्यात. अगदी उण्यापु-या 13 मिनिटांत युट्यूबवर या गाण्याला 10 मिलियन म्हणजे 1 कोटी व्ह्युज मिळाले. 5 तासांत 4.5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला.
बीटीएस बॉय बँड हा बेंगटन बॉइज या नावानेही ओळखला जातो. या कोरियन बँडमध्ये सात सदस्य आहेत. 2010 मध्ये सात जणांनी मिळून हा बँड सुरु केला. आरएम, जिन, सुगा, जे-होप, व्ही, जिमीन आणि जंगकूक अशी या ग्रूपमधील सदस्यांची नावे आहेत. हा ग्रूप के पॉप, हीप हॉप प्रकारात डान्स व्हिडीओ बनवतात. 2013 पर्यंत या बँडला फार कुणी ओळखतही नव्हते. पण 2013 मध्ये या बँडचा ‘2 cool 4 skool’ नावाचा अल्बम आला आणि या अल्बमने धूम केली. यानंतर या बँडने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज काय तर हा बँड दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेसाठीही वरदान ठरला आहे. ‘डायनामाइट’नंतर ‘बीटीएस बटर’ या बँडचे दुसरे इंग्लिश सिंगल आहे. याआधी या गाण्याचा 23 सेकंदाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. हा टीजरही तुफान व्हायरल झाला होता. तासांभरात कोट्यवधी लोकांनी हा टीजर पाहिला होता.23 मे रोजी ‘बिलबोर्ड म्युझिक अवार्ड्स’मध्ये बीएस ‘बीटीएस बटर’ हे गाणे परफॉर्म करणार आहे.