कोरोना व्हायरसमुळे देश आणि जगभर दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा पहिला रूग्ण चीनमध्ये सापडला होता. चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले होते. यानंतर हा व्हायरस जगभर पसरला आणि त्याने लाखो लोकांचा बळी घेतला. कोट्यवधी लोक या व्हायरसच्या तडाख्यात सापडले. तूर्तास अनेक देश या व्हायरसशी युद्धस्तरावर लढत आहेत. वुहानमधील स्थिती मात्र सध्या नियंत्रणात आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतेय. अर्थात तरीही लोकांमधील कोरोनाची दहशत संपलेली नाही.चीनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली जवळजवळ 500 चित्रपटगृहे पुन्हा उघडण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसमुळे ही चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा प्रेक्षकांसाठी उघडली आहेत. पण चित्रपटगृहे पुन्हा उघडल्यापासून आत्तापर्यंत एकही तिकिट विकले गेलेले नाही. कोरोनामुळे एकही प्रेक्षक या चित्रपटगृहांकडे फिरकलेला नाही.
द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये एकूण 70 हजार चित्रपटगृहे आहेत. स्थिती सामान्य होताच यापैकी 507 चित्रपटगृहे उघडण्यात आली. कोरोनाच्या संसर्गापासून बचावलेल्या भागातील ही चित्रपटगृहे आहेत. पण अद्याप एकही प्रेक्षक या चित्रपटगृहांकडे फिरकला नाही. एकंदर काय तर चीनमधील लोक अद्यापही कोरोनाच्या दहशतीतून बाहेर आलेले नाही.
भारतातही चित्रपट उद्योग ठप्पकोरोनामुळे अख्ख्या भारतात शटडाऊन आहे. काही राज्यांत संपूर्ण संचारबंदी आहे. सर्व जनजीवन अक्षरश: ठप्प पडले आहे. मुंबईतही वेगळी स्थिती नाही. कधी न थांबणारी मुंबईही स्तब्ध आहे. विशेष म्हणजे मुंबईतील फिल्म व टीव्ही इंडस्ट्रीही बंद आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद आहेत. अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीच्या स्टार्सनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.