जगप्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँड 'कोल्डप्ले'ची कॉन्सर्ट मुंबईत होणार आहे. याचं आयोजननवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. कोल्डप्लेचे भारतातही करोडो चाहते आहेत. मोठ्या संख्येने चाहते या कॉन्सर्टला हजेरी लावणार आहेत. दरम्यान गायक क्रिस मार्टिन (Chris Martin) आपल्या बँडसह मुंबईत दाखल झाला. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री डकोटा जॉन्सनही दिसत आहे. कलिना विमानतळाबाहेरचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कोल्ड प्ले बँड आपल्या 'म्युझिक ऑफ द स्फीअर्स वर्ल्ड टूरवर आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये १८,१९ आणि २१ जानेवारी रोजी त्यांचे तीन शो आहेत. यामधून ते आपल्या परफॉर्मन्सने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नुकतंच बँडमधील मुख्य सदस्य क्रिस मार्टिन त्याच्या गर्लफ्रेंडसह कलिना विमानतळावर दाखल झाला. क्रिस यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसला. पापाराझींसमोर त्याने हात दाखवला. इतकंच नाही तर हात जोडून अभिवादनही केलं. त्याचा हा साधेपणा पाहून चाहते प्रभावित झालेत. यावेळी त्यांच्या कॉन्सर्टला रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे.
क्रिस मार्टिनसोबत त्याची गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनही आली आहे. डकोटा 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या सिनेमासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिससोबत तिचं ब्रेकअप झाल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आता ती देखील मुंबईत आल्याने या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.