अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. सध्या सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये असून त्याने तिथून त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मी प्रचंड घाबरलो आहे असे तो या व्हिडिओद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगत आहे.
भारतात लॉकडाऊन जाहीर व्हायच्या काही दिवस आधी सलमान त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत पनवेल येथील फार्म हाऊसवर गेला होता. त्याचा भाचा अहिलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही मंडळी फार्म हाऊसला पोहोचली होती. फार्म हाऊसवर सध्या सलमानसोबत त्याची आई, बहीण, भाचे आणि काही मित्रमंडळी आहेत. पण सलमानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान वांद्रे येथील त्यांच्या घरी एकटेच आहेत. सलमानने नुकताच सोहेलचा मुलगा निर्वान खानसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
सलमानने पोस्ट केलेल्या या व्हिडिओद्वारे तो त्याच्या फॅन्सना सांगत आहे की, आम्ही सगळे येथे केवळ काही दिवसांसाठी आलो होतो. पण सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्हाला येथेच राहाण्याशिवाय पर्याय नाहीये. आम्ही सगळेच प्रचंड घाबरलेलो आहोत. या व्हिडिओत सलमान निर्वानला विचारत आहे की, तू तुझ्या वडिलांना किती दिवसांपासून पाहिलेले नाहीये... त्यावर निर्वान सांगतोय की, तीन आठवडे तरी झाले. त्यावर सलमान उत्तर देत आहे की, मी देखील तीन आठवड्यांपासून माझ्या वडिलांना पाहिलेले नाही. आम्ही सगळे येथे आहोत तर ते घरी एकटे आहेत. पुढे सलमान निर्वानला विचारतो की, जो डर गया समझो मर गया हा संवाद तुला आठवतोय का? त्यावर निर्वान होकार देतो तर सलमान म्हणतो, हा संवाद सध्याच्या परिस्थितीनुसार योग्य नाहीये. मी सगळ्यांना सांगू इच्छितोय की, आम्ही सगळे घाबरलेलो आहोत... प्रचंड घाबरलेलो आहोत... तुम्ही देखील उगाचच बहादूर बनू नका...
या व्हिडिओत सलमान शेवटी सांगत आहे की, या व्हिडिओची मोरल ऑफ द स्टोरी आहे की, आम्ही सगळे प्रचंड घाबरलेलो आहोत. जो घाबरणार, तोच वाचणार आहे आणि आतापर्यंत जे घाबरले तेच यापासून वाचले आहेत.
सलमानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्याने खूपच चांगला संदेश दिला असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.