Join us

Corona Virus : कोरोनाचा ‘जेम्स बॉन्ड’लाही फटका, या हॉलिवूडपटांचीही वाढली प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 4:14 PM

हॉलिवूडपटांचे चाहते असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी...

ठळक मुद्देहॉलिवूडचा कल्ट क्लासिक ‘जेम्स बॉन्ड’ पाहण्यासाठीही प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग ठप्प आहे़ मनोरंजन विश्वही ठप्प आहे. बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडही थांबले आहे. अशात हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. हॉलिवूडचा कल्ट क्लासिक ‘जेम्स बॉन्ड’ पाहण्यासाठीही प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. हॉलिवूडच्या अनेक बड्या चित्रपटांना  चित्रपटगृह उघडण्याची प्रतीक्षा आहे. हे बडे हॉलिवूडपट कोणते, यावर एक नजर..

जेम्स बॉन्ड- नो टाइम टू डाय

डॅनियल क्रेग या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा 51 वर्षीय डॅनियल क्रेग सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारा बाँड अभिनेता आहे. 2005 पासून त्याने 4 जेम्स बाँड चित्रपट केले आहेत. आगामी ‘नो टाइम टू डाय’ हा त्याचा पाचवा बाँडपट आहे. याच महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोनाने हाहाकार माजला तसा या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकली गेली. आता या सिनेमासाठी नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मिशल इम्पॉसिबल

टॉम क्रूजचा अ‍ॅक्शन पॅक्ड मिशल इम्पॉसिबल शृंखलेतील सातवा सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. या सिनेमाचे इटलीत शूटींग सुरु होते. पण इटलीत कोरोनामुळे स्थिती अशी काही बिघडली की शूटींग गुंडाळावे लागले. त्यामुळे जुलै 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी अपेक्षा आहे.

ज्युरासिक वर्ल्ड- डोमिनियन

ज्युरासिक वर्ल्ड फ्रेन्चाइजीच्या या सिनेमाच्या प्रॉडक्शनचे काम सुरु होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे हे काम थांबवण्यात आले. हा सिनेमा पुढील वर्षी जूनमध्ये रिलीज होणार आहे. पण आता या नियोजित तारखेला तो रिलीज होतो की त्याचे रिलीज लांबणीवर पडते, ते अद्याप सांगता यायचे नाही.

फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस9

फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस फ्रेन्चाइजीचा 9 वा सिनेमा खरे तर रिलीजसाठी तयार होता. फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस -9 चा ट्रेलरही रिलीज झाला होता. येत्या 22 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता कोरोनामुळे याची  पुढील वर्षी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :हॉलिवूड