जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 42 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान अनेक नेते मंडळींना, सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशातच आता हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला (Famous Singer Justin Bieber) कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या टीमने याबाबत माहिती दिली असून शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं म्हटलं आहे.
जस्टीनला क्वारंटाईन करण्यात आलं असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिची समोर आली आहे. रविवारी लास वेगासमध्ये जस्टीनचा 'जस्टिस वर्ल्ड विल' हा कार्यक्रम पार पडणार होता. पण त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जस्टीनचा मोठा चाहतावर्ग आहे. तसेच तरुणांमध्ये त्याची क्रेझ असून त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची काळजी आहे.
आपल्या गाण्यांनी जगभरातील तरूणाईला वेड लावणारा पॉप सिंगर जस्टीन बीबरने 2008 साली गायनाला सुरुवात केली आणि त्याच्या गाण्यांनी तरूणाईला भुरळ घातली. उण्यापु-या वयाच्या 13 व्या वर्षी तो ग्लोबल स्टार बनला. जस्टीनचे जगभर चाहते आहेत. पण आता या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. जस्टीन एका गंभीर आणि दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. खुद्द जस्टीनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती.
जस्टीनचा आजार सामान्य आजार नाही. Lyme diseaseनावाचा हा आजार आहे. या आजाराबद्दल माहिती देताना त्याने लिहिले, ‘जस्टीन बीबर अलीकडे खूप घाणेरडा दिसतोय, असे अनेक लोक म्हणत आहेत. पण मी आजारी आहे, हे ते पाहू शकत नाहीत. अलीकडे मला Lyme disease असल्याचे निदान झाले. केवळ हेच नाही तर chronic monoचेही निदान झाले होते. यामुळे माझी त्वचा, माझा मेंदू, माझ्या शरीराची उर्जा एकंदर काय तर अख्खा शरीरावर परिणाम झाला आहे.’ आपल्या या आजारावर जस्टीन बीबर लवकरच एक डॉक्युमेंट्री घेऊन येणार आहे. यु ट्यूबवर ही डॉक्युमेंट्री अपलोड होणार आहे. ही डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर मी कशातून जातोय, हे तुम्हाला कळेल, असे जस्टीनने लिहिले होते.