Oscar 2022 : दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्कर सोहळा रंगला. हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात ‘ड्यून’ या चित्रपटानं सिक्सर मारत, 6 ऑस्करवर आपलं नावं कोरलं. ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथ याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पटकावला. तर जेसिका चेस्टेन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. एक ऐतिहासिक क्षण या सोहळ्याच्या निमित्ताने अख्ख्या जगानं पाहिला. होय, ऑस्करच्या इतिहासात प्रथमच एका कर्णबधिर अभिनेत्याला ऑस्कर देऊन गौरविण्यात आलं. होय, 53वर्षीय ट्रॉय कोत्सुर (Troy Kotsur) यांना या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर देण्यात आला.
ट्रॉय कोत्सुर यांच्या नावाची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘कोडा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ट्रॉय कोत्सुर यांना ऑस्कर देण्यात आला. हा पुरस्कार जिंकत ट्रॉय यांनी इतिहास रचला. ते सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर जिंकणारे पहिले पुरूष मूकबधिर कलाकार ठरले. सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर जिंकल्यानंतर ट्राय यांनी सांकेतिक भाषेत भाषण केलं. ‘मी आज या मंचावर उभा आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. इथंपर्यंतचा हा प्रवास खरंच रोमांचक होता. माझा हा अवार्ड कर्णबधिर आणि कोडा कम्युनिटीला समर्पित करतो. मी माझी जन्मभूमी, माझे जन्मदाते, माझा भाऊ, माझी पत्नी आणि माझी लेक सर्वांचे आभार मानतो,’ या शब्दात ट्रॉय कोत्सुर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘कोडा’ या बेस्ट फिल्मचा ऑस्कर जिंकणाऱ्या चित्रपटात ट्रॉय कोत्सुर यांनी फ्रँक रोसीची भूमिका साकारली आहे. ज्याचं कुटुंब मासेमारी करून पोट भरत असतं. हवामान बदलामुळे या कुटुंबाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशी ‘कोडा’ या चित्रपटाची कथा आहे.
दरम्यान या आधी पहिली कर्णबधिर महिला कलाकार म्हणून मार्ली मॅटलिन हिने ऑस्कर जिंकला होता. 1986 मध्ये आलेल्या ‘चिल्ड्रेन ऑफ अ लेसर गॉड’ या चित्रपटात तिने सारा नार्मनची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी वयाच्या 18 व्या वर्षी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत ऑस्कर जिंकला होता. ती ऑस्कर जिंकणारी पहिली कर्णबधिर अभिनेत्री होती. आता ट्रॉय कोत्सुर हे सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर जिंकणारे पहिले कर्णबधिर अभिनेते ठरले आहेत.