Join us

डेमी लोवाटाने या कारणामुळे घर विकण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 5:26 PM

हॉलिवूडची स्टार गायिका डेमी लोवाटा सध्या आपल्या घरासाठी गिऱ्हाईक शोधते आहे. याच घरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेमी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ अवस्थेत सापडली होती. या ड्रग्जच्या व्यसनापासून स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न डेमी करते आहे.

ठळक मुद्देडेमी ड्रग्जमुळे घरातच सापडली होती शुद्धावस्थेत प्रियांका चोप्रानेही डेमीच्या प्रकृतीबाबत व्यक्‍त केली चिंता

हॉलिवूडची स्टार गायिका डेमी लोवाटा सध्या आपल्या घरासाठी गिऱ्हाईक शोधते आहे. याच घरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेमी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ अवस्थेत सापडली होती. या ड्रग्जच्या व्यसनापासून स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न डेमी करते आहे. तिला स्वत:वरील उपचारांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच तिने चक्क घरच विकून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. लॉस अँजेलिसमधील हॉलिवूड हिल्समधील चार बेडरूम आणि सहा बाथरूम असलेले घर 9.49 दशलक्ष डॉलरला विकण्याचे तिने ठरवले आहे.

'सॉरी नॉट सॉरी' या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली डेमी ड्रग्जमुळे घरातच बेशुद्धावस्थेत सापडली आणि तिला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते. या काळात डेमी वाचते की नाही, एवढी शंकाही व्यक्‍त व्हायला लागली होती. डेमीच्या आत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून डेमी सुखरूप असल्याचे सगळ्यांना सांगितले. त्यानंतर ऑगस्टमध्ये तिला शिकागोला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्यासाठी जावे लागले. अवघ्या 26 वर्षांची डेमी गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जच्या विळख्यापासून सुटण्याचा प्रयत्न करते आहे. तिने सिंपल कॉम्प्लिकेटेड या माहितीपटातून आपल्या आयुष्याची कहाणीच प्रेक्षकांसमोर मांडली आहे. जूनमध्ये सोबर या अल्बममधूनही तिने ड्रग्जविरोधातील आपला लढा मांडला आहे.डेमीची मैत्रीण आणि डान्सर डॅनी विटाली हीच डेमीला ड्रग्जचे व्यसन लावण्यात कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र, डॅनीने हा आरोप फेटाळला आहे. आपल्या अख्ख्या आयुष्यात आपण कधीही ड्रग्जला हात लावलेले नाही. आपल्या प्रिय मैत्रिणीला मी हे व्यसन लावेलच कशी? असा प्रश्‍नही तिने विचारला.

गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या प्रियांका चोप्रानेही डेमीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्‍त केली आहे. एवढेच नव्हे तर प्रियांकाचा होणारा नवरा निक जोनासनेही डेमी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजनी डेमीच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.