'फ्रेंड्स' या लोकप्रिय अमेरिकन सीरिजमधील अभिनेता मॅथ्यू पेरीचं गेल्यावर्षी निधन झालं. यामुळे फ्रेंड्स च्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. ड्रग्स ओव्हरडोसमुळे त्याचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता एक वर्षाने 2 डॉक्टरांसह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात मॅथ्यू पेरीच्या असिस्टंटचाही समावेश आहे. मॅथ्यू पेरीची हत्या झाल्याचा संशय आहे.
अमेरिकन अॅटॉर्नी मार्टिन एस्ट्राडाने माहिती दिली की, "या आरोपींनी पैशांसाठी मॅथ्यूच्या नशा करण्याच्या सवयीचा फायदा घेतला. मॅथ्यूला ओव्हरडोस होत आहे याची त्यांना कल्पना होती. तरी त्यांनी त्याला थांबवले नाही. आरोपींना अटक करताना अनेक पुरावेही मिळाले आहेत. यातून स्पष्ट होतं की मॅथ्यूला दुर्देवाने त्याच्या जवळच्या व्यक्तींनीच कट रचून मारले अशी शक्यता आहे.
मॅथ्यू पेरीच्या सहायक केनेथ इवामासा आणि मेडिकल प्रोफेशनल्सने कथितरित्या त्याला हजारो डॉलरचे केटामाईन ड्रग्स विकले. याचमुळे त्याला मृत्यू झाला. या आरोपींमध्ये जसवीन संघा ही महिला सामील आहे जिला 'केटामाइन क्वीन' म्हणूनही ओळखलं जातं. मॅथ्यूच्या शरिरात केटामाइन ड्रग्स इन्जेक्ट केलं गेलं. यामुळे माणूस इतका नशेत जातो की बेशुद्ध पडतो. डिप्रेशन आणि अस्वस्थता यावर उपचारासाठी डॉक्टरद्वारे प्रिस्क्राइब असेल तरच हे दिलं जातं. मात्र बऱ्याचदा याचा दुरुपयोग होतो. या प्रकरणात ४१ वर्षी जसवीन संघासोबत ४२ वर्षीय डॉक्टर साल्वाडोर पलसेंसियाला अटक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मॅथ्यू पेरीचा मृतदेह हॉटटबमध्ये आढळला होता.