कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कॉमेडियनचे कोरोना व्हायरसची लागण झाल्याने निधन झाले आहे.
ब्रिटनचे प्रसिद्ध अभिनेता टिम ब्रुक-टेलर यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले असून ते ७९ वर्षांचे होते. रविवारी त्यांचे निधन झाले असून सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. गुडीजमध्ये आपल्याला तीन हास्य कलाकारांची तिकडी पाहायला मिळाली होती. त्या तिघांपैकी ते एक होते. तसेच त्यांनी ग्रीम गार्डन आणि बिल ऑडीमध्ये देखील काम केले होते. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात १९६० मध्ये रेडिओद्वारे केली. त्यांच्या फंकी गिबन या गाण्याला तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
एकेकाळी एट लास्ट द 1948 शो हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमाचा देखील टीम हिस्सा होते. या कार्यक्रमात जॉन क्लीज आणि ग्रेहम चॅपमॅनसारखे दिग्गज देखील होते.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे.