66th Grammy Awards 2024: संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा सोहळ्याचं 66 वं वर्ष होतं. या सोहळ्यात भारतानेही बाजी मारत 4 पुरस्कार पटकावले. शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या 'शक्ती' या फ्युजन बँडने ग्रॅमी जिंकला. आणखी एका कारणाने हा पुरस्कार सोहळा भलताच चर्चेत आहे. प्रसिद्ध रॅपर किलर माइकने (Killer Mike) यांदा तीन पुरस्कार मिळवले. मात्र अवॉर्ड सोहळ्यानंतर लगेचच त्याला अटक झाली. त्याला पोलिस घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रॅपर किलर माइकने रविवारी संगीत क्षेत्रातील सर्वात मोठ्या पुरस्कारावर मोहर उमटवली. तीन ग्रॅमी अवॉर्ड्स मिळाल्याने तो खूप आनंदात होता. या सोहळ्यानंतर रविवारी रात्रीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याला ताब्यात घेतले गेले आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाहीए. तुम्ही खरोखर मला नेत आहात का? असं तो विचारताना दिसतोय. लॉस एंजिलिस पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. अवॉर्ड सोहळ्यानंतर त्याच्या गैरवर्तवणुकीमुळे त्याला अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याच्या टीमकडून अद्याप कोणतंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
अवॉर्ड मिळाल्यानंतर किलर माइक म्हणाला, "तुम्ही तुमच्या वयाबद्दल आणि जे करत आहात त्याबद्दल खरं बोलला नाहीत तर हीच गोष्ट तुमच्यावर मर्यादा घालेल. मी वयाच्या २० व्या वर्षी ड्रग डीलर होण्याचा विचार केला होता. ४० व्या वर्षी मी पश्चात्तापात जगत होतो. ४५ व्या वर्षी मी यावर रॅप गायला सुरुवात केली. आज मी ४८ व्या वर्षी आज तुमच्यासमोर असा व्यक्ती उभा आहे ज्याला त्याच्या कर्मामुळे सहानुभूती आणि संवेदना आहे."
किलर माइकने पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट रॅप प्रदर्शन, रॅप गीत आणि कॅप अल्बमसाठी पुरस्कार पटकावले. 'साइंटिस्ट्स अँड इंजीनिअर्स'साठी त्याला सर्वोत्कृष्ट रॅप प्रदर्शन अवॉर्ड मिळाला. यासाठीच त्याला सर्वोत्कृष्ट रॅप गीत आणि 'मायकल'साठी सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम पुरस्कार मिळाला. त्याला शेवटचा ग्रॅमी 2003 साली 'द होल वर्ल्ड'साठी मिळाला होता.